अॅड. रिया करंजकर
अर्ज घेणे आज-काल एक सोपी पद्धत झालेली आहे. बँक आज-काल ग्राहकांना फोन करून आमच्या बँकेतून लोन घ्या, तुम्हाला व्याजदर कमी आहे असे फोन करून ग्राहकांना कर्ज घेण्यासाठी भाग पाडतात आणि कर्ज मिळाले नाही की, याच ग्राहकांना नोटीस पाठवून अनेक प्रकारे हैराणही करतात.तसेच आजकाल अनेक पतसंस्थांचा निस्ता सुळसुळाट झालेला आहे. या पतसंस्था लोकांना वेगवेगळ्या प्रकारे कर्ज देतात. हे कर्ज अनेक प्रकारचे असते. उदा. होमलोन, कारलोन, गोल्ड लोन इ. गुरुकृपा नावाची एक पतसंस्था होती. त्याच्यात अनेक लोकांची खाती होती. ही संस्था गोल्ड लोन देत होती. पैसे पूर्ण झाल्यावर ते सोनं ग्राहक सोडवून घ्यायचे. अशा बँकेच्या पद्धतीसारखी त्यांची पद्धत होती. पण त्यांची टक्केवारी ही जास्त होती. सुरेशचे या पतसंस्थेमध्ये खाते होते.सुरेशला कर्ज पाहिजे होते म्हणून त्याने मित्र अनिलच्या नावावर गोल्ड लोन पाहिजे असे पतसंस्थेला सांगितले. सोने ठेवायच्या अगोदर त्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आणि आम्ही तुम्हाला सोने देतो असे सांगितले. सुरेश अनिलला सोबत घेऊन गेला तो काही वेळानंतर पुन्हा पतसंस्थेजवळ आला. त्यांनी सोन्याची भरलेली थैली अनिलकडे दिली आणि तू पतसंस्थेत नेऊन दे असे त्यांना सांगितले. अनिल सुरेशबरोबर तिथे गेला होता. त्यामुळे त्याला पतसंस्था माहित होती. म्हणून अनिल गोल्डची थैली घेऊन पतसंस्थेत गेला आणि त्याने ते दागिने पतसंस्थेच्या अधिकाऱ्याला सुपूर्द केले. त्यासाठी लागणाऱ्या कागदांची पूर्तता अगोदरच केलेली असल्यामुळे त्या दागिन्यांचे वजन करण्यात अाले. सुरेशच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले. दागिने दिल्यानंतर अनिल तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी अनिल राहत असलेल्या ठिकाणी पोलीस गेले. अनिलला पोलिसांनी ताब्यात घेतले.
आपल्याला पोलिसांनी का ताब्यात घेतले हेच त्याला कळेना. पोलीस स्टेशनवर आल्यावर पोलिसांनी त्याची चौकशी करायला सुरुवात केली. पतसंस्थेमधला अधिकारी तिथे आला आणि त्याने अनिलला ओळखले हाच आपल्याकडे दागिने देऊन दिला होता असे त्यांने सांगितले. पतसंस्थेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये अनिल दागिने देत असताना दिसत आहे. अनिलने सांगितले की, हे माझे दागिने नव्हते. ते सुरेशने कर्ज घेतलेले होते. सुरेशने पतसंस्थेवर अगोदर कागदपत्र केलेली होती. मला फक्त वरती दागिने घेऊन जाण्यास सांगितले होते. तेच मी केले होते. पण मला का अटक केली असे तो सतत विचारू लागला. तोपर्यंत त्याचे कुटुंबीय पोलीस स्टेशनपर्यंत आलेले होते. पोलिसांनी सांगितले की, अनिलने पतसंस्थेला दिलेले दागिने हे खोटे होते. त्यामुळे अनिलने पतसंस्थेची फसवणूक केलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याला अटक केली आहे. कारण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये अनिल हा दागिने देताना दिसत आहे. पोलिसांनी त्याला पोलीस कस्टडीमध्ये घेतले. सुरेश हा मात्र पळून गेला होता. अनिल हा मित्रासोबत फक्त त्या पतसंस्थेत गेला होता. मित्राला मदत करायला गेला नि स्वत:च या जाळ्यात फसला होता. आपल्या मित्रांने दिलेले दागिने सोन्याचे कुठे आहेत हे मात्र त्याला माहीत नव्हते. मित्राने दागिने दिले ते त्याने तिथे नेऊन दिले. एवढेच नाही, तर त्या पतसंस्थेतील अधिकाऱ्यांनी त्या दागिन्यांचे वजन करून घेतले पण त्यांची जबाबदारी होती की, ते दागिने त्यांनी तपासून घ्यायला पाहिजे होते. ते त्यांनी त्यावेळी घेतले नाही, जर त्यावेळी त्या अधिकाऱ्याने ते दागिने तपासून घेतले असते, तर सुरेशही पकडला गेला असता. कारण दागिन्यांचे वजन केल्यावर लगेचच पैसे सुरेशच्या खात्यामध्ये पतसंस्थेने जमा केलेले होते. या सर्व गोष्टीला जबाबदार मात्र अनिलला ठेवले होते. कारण त्याने ते दागिने पतसंस्थेत आणून जमा केले होते. अनिल मित्राला मदत करायला गेला आणि त्याच्याच जाळ्यात तो फसला. दागिने पतसंस्थेला देताना अनिल दिसत आहे. त्यामुळे ही फसवणूक अनिलनेच केली असे पोलिसांच्या तपासात सिद्ध झाले होते. अनिलच्या वकिलांची युक्तिवाद करून अनिलला या प्रकरणातून कसे सोडवता येईल यासाठी प्रयत्न करत होते. मित्राला मदत करण्याच्या नादात अनिल मात्र या प्रकरणात फसला होता.
(सत्यघटनेवर आधारित)