प्रा. प्रतिभा सराफ
हेल्थ सेंटर’ ही पाटी दिसली की, नकळतपणे आपली पावले तिकडे वळतात. का कुणास ठाऊक; परंतु हेल्थ म्हणजे आरोग्य यासाठी आपल्याला काहीतरी तयार (रेडीमेड) आणि सोपा उपाय हवा असतो. मीही त्याला अपवाद नाही म्हणा! माझ्या सोसायटीच्या दाराशीच मला एक पाटी दिसली. ‘… हेल्थ सेंटर.’ अनेक वर्षे… या संस्थेविषयीच्या जाहिराती सोशल मीडियावर पाहिलेल्या होत्या, काही मित्र-मैत्रिणींकडून याविषयी ऐकलेलेही होते. येता-जाता रोजच ती पाटी दिसू लागली. त्यामुळे स्वाभाविकपणे तिथे जाण्याची मला इच्छा झाली. खरे कारण तर वेगळेच आहेत त्या पाटीवर लिहिले होते की, ‘प्राथमिक आरोग्य तपासणी’ फुकट आहे. ‘एकावर एक फ्री’, ‘या वस्तूवरती ही वस्तू फ्री’ अशा पाट्या नेहमीच माणसाला आकर्षित करतात. इथे तर प्राथमिक आरोग्य तपासणी फ्री मग काय कोणालाही तिथे जाण्याचा मोह होईलच ना! त्या ‘हेल्थ सेंटर’मध्ये गेल्यावर मला सांगण्यात आले की, डॉक्टर काही कारणास्तव आलेले नाहीत; परंतु तुमची फाईल आम्ही तयार करून ठेवतो आणि डॉक्टरांना विचारून तुम्हाला अपॉइंटमेंटचे कळवतो. रितसर माझी उंची, वजन तपासण्यात आले. छातीचा, कमरेचा इ. घेर तपासण्यात आला. त्यानंतर एका मुलीने माझा बीपी तपासला तोपर्यंत ठीक होते. त्यानंतर मात्र ती मुलगी हातात सुई घेऊन आली आणि मला म्हणाली की, तुमची शुगर तपासायची आहे. मी तिला विचारले, “तुम्ही डॉक्टर आहात का?
ती म्हणाली, “नाही मी मदतनीस आहे.”
मी सरळ सांगितले, “मी कोणतीही सुई माझ्या अंगावर टोचून घेणार नाही.”
तर तिथे असणारी रिसेप्शनिस्ट म्हणाली,
“ते अजिबात दुखत नाही.”
तर मी उत्तरले,
“प्रश्न दुखण्याचा नाही पण मी कोणाहीकडून अशी तपासणी करून घेऊ शकत नाही.”
शेवटी ‘हो’, ‘नाही’ करत तिने माझ्या बोटावर ती सुई टोचली आणि एक थेंब रक्त काढून घेतले आणि क्षणात तिने सांगितले की, माझी शुगर ३१० आहे. मला डायबिटीस नाही आणि डायबिटीसची कोणतीही गोळीही चालू नाही, अशा परिस्थितीत माझ्या शरीरात साखरेचे प्रमाण इतके जास्त? माझ्या शरीरातील साखरेची पातळी इतकी वाढल्याचे, माझ्या लक्षात येऊ नये? साखर तपासल्यानंतर जर तिने बीपी तपासला असता तर तो त्यादिवशी नक्कीच २०० च्या वर दाखवला गेला असता! मी वाकून वाकून मशीनमध्ये पाहिले पण आकडा ३१०च होता. मी परत परत मला मधुमेह नसल्याचे सांगत राहिले तर त्यांनी मला विचारले की, तपासणीसाठी उद्या माणूस पाठवू का घरी म्हणजे तुमची खात्री होईल? मनात यांच्या मशीनविषयीच शंका निर्माण झाल्यामुळे मी त्यांना सांगितले, “नको, मी माझ्या पद्धतीने तपासून घेईन!”
त्यांनी अतिशय गोड शब्दांत मला सांगितले, “कितीही जास्त प्रमाणात मधुमेह असला तरी आमच्याकडच्या उपायांनी तो नॉर्मल होतो. काळजी करू नका.”घरी आल्यावर फॅमिली डॉक्टरला फोन केला तर ते म्हणाले, “पुढची दहा वर्षेसुद्धा तुझी साखर वाढू शकत नाही! संध्याकाळी दवाखान्यात ये मी तपासतो. रिक्षाने २०० रुपये खर्च करून आणि तासा-दोन तासांचा वेळ खर्च करून त्यांच्याकडे गेले. त्यांनी माझे शुगर तपासले तर ती नॉर्मल होती. तरीही त्यांनी पूर्ण खात्रीसाठी आणखी एखाद्या ठिकाणाहून तपासून घे, असे सांगितले. दोन-तीन दिवसांनंतर आणखी एका ठिकाणी जाऊन तपासून घेतली. शरीरातील साखरेची पातळी जराही वाढलेली नव्हती, याची पूर्ण खात्री झाली आणि मग त्यादिवशी निघता निघता त्या रिसेप्शनिस्टने सांगितलेले वाक्य मला आठवले की, आमच्याकडच्या उपायांनी मधुमेह आटोक्यात येतो! तर मग सर्वसाधारण माणसाला मधुमेह नसताना त्याची वाढलेली साखर दाखवणारे ते यंत्र मला आठवले आणि मग त्यांच्याकडचे उपाय केल्यावर दुसऱ्या यंत्रांने मधुमेह कसा गेला, हे दाखवले जात असावे, याची खात्रीच पटली. त्यानंतर कमीत कमी दहा वेळा त्यांनी मला फोन केला असेल; परंतु मी त्यांच्याकडे जाणे नाकारले. त्यांच्या डॉक्टरांनी फोन केल्यावर मात्र मला झालेल्या मानसिक त्रासाविषयी बोलले. त्या डॉक्टरांनी झाल्याप्रकाराविषयी माझी माफी मागितली. आतापर्यंत कोणत्या हेल्थ सेंटरमध्ये हे सर्व घडले, याची वाच्यता मी, माझे फॅमिली डॉक्टर सोडून कोणाहीकडे केलेली नाही. कोणतेही हेल्थ सेंटर वेगवेगळ्या प्रकारे माणसांना आपल्याकडे येण्यास भाग पाडत असतीलही; परंतु ते त्यांच्या पेशंट्सना खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी लावतात, त्यांच्या जीवनशैलीमध्ये बदल घडून आणतात हे मात्र निश्चितच! त्यामुळे कोणत्याही ‘हेल्थ सेंटर’ची मला या लेखाद्वारे बदनामी करायची नाही; परंतु सावधपणे आणि आपल्या खिशाला परवडेल आणि खात्रीशीर वाटेल शिवाय ‘सेकंड ओपिनियन’ घेऊनच अशा ठिकाणी आपण उपचार करून घ्यावेत एवढेच या लेखाद्वारे सांगायचे आहे!
Health is Wealth but Wealth is not only for Health!
pratibha.saraph@ gmail.com