मैत्री

रमेश तांबे


एक होती राणी आणि एक होती सोनी. दोघी एकमेकींच्या अगदी जीवलग मैत्रिणी. वर्गात एकाच बाकड्यावर दोघी बसायच्या. परीक्षेतले गुणदेखील दोघींचे सारखेच. सगळ्या शाळेत राणी-सोनीची जोडी प्रसिद्ध होती. दोघींची उंची, रंग, अंगकाठी साधारण सारखीच. फरक फक्त एकच होता, तो म्हणजे राणी बऱ्यापैकी श्रीमंत घरातली मुलगी होती आणि सोनी मात्र गरीब. सोनीचे वडील एका कारखान्यात कामाला, तर राणीच्या वडिलांचा स्वतःचा कारखाना होता. राणीच्या वडिलांनी मुद्दामहून सरकारी शाळेत राणीचे नाव घातले होते. जेणेकरून तिलाही गरिबी म्हणजे काय ते कळावे. तेसुद्धा अगदी गरिबीतून पुढे आलेले होते. पण याची जाणीव राणीलाही असावी म्हणूनच ती मोठ्या आनंदाने एका सरकारी शाळेत शिकत होती.पण ही श्रीमंती-गरिबी राणी-सोनीच्या मैत्री आड कधीच आली नाही. कारण राणी रोज स्वतःच्या गाडीने शाळेत यायची पण सोनीच्या घराच्या अगोदरच स्वतःची गाडी सोडून ती सोनी बरोबर चालत जायची. सोनीच्या डब्यांचे जसे पदार्थ असतात, तसेच पदार्थ राणीदेखील आणायची. दोघी एकमेकींचे डबे आवडीने खात असत. सारे काही सुरळीत सुरू असताना अचानकपणे सोनी शाळेत यायची बंद झाली. आठवडा झाला तरी सोनी येत नव्हती. राणी खूप बैचेन झाली. मग एक दिवस ती वर्गातल्या दोन मुलींसोबत सोनीच्या घरी गेली. तेव्हा तिला समजले की, सोनीचे वडील हॉस्पिटलमध्ये आहेत.


दुसऱ्याच दिवशी राणी सोनीच्या वडिलांना शोधत शोधत हॉस्पिटलमध्ये पोहोचली. हॉस्पिटल खूप मोठे होते. सहाव्या मजल्यावरच्या एका खोलीत सोनी बाबांच्या शेजारी बसलेली दिसली. तिच्या हातात शाळेचे पुस्तकदेखील होते. सोनीला बघताच राणीने धावत जाऊन तिला मिठी मारली. तिच्या बाबांची चौकशी केली. आता त्यांची तब्येत बरी होती. दोन दिवसांनी त्यांना सोडणार होते. अर्धा तास थांबून राणी हॉस्पिटलच्या बाहेर पडली. आठ दिवसांचे बिल सोनीचे बाबा कसे भरणार? याची राणीला चिंता वाटत होती त्याच विचारात ती घरी पोहोचली. राणीचे आई-बाबा हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते. तिने रडवलेल्या स्वरात सोनीच्या बाबांचा वृत्तांत सांगितला आणि ती म्हणाली, “बाबा सोनी माझी खास मैत्रीण आहे. तिला आपण मदत केली पाहिजे.” राणीच्या आई-बाबांना आपली मुलगी दुसऱ्याच्या अडचणी, भावना-दुःख समजून घेते आहे याचे कौतुकच वाटले. आपण सरकारी शाळेत राणीचे नाव घालून तिला खऱ्या अर्थाने माणूस बनवले आहे याचा त्यांना अभिमान वाटला. बाबा राणीला म्हणाले, “अगं राणी, सोनी तुझी खूपच जवळची मैत्रीण आहे हे मला माहीत आहे. त्या मैत्रीखातर आपण त्यांच्या आजारपणाचा सर्व खर्च करू. तू काही काळजी करू नकोस.” हे ऐकताच राणीने बाबांना गच्च मिठी मारली. तेव्हा बाबा म्हणाले, “पण एक गोष्ट लक्षात ठेव राणी! हे काम तू केलेस हे सोनीला कधीही कळू देता कामा नये.” आपण लोकांना मदत करावी, पण अगदी कुणालाही कळू न देता!” “होय बाबा” राणी मोठ्या निश्चयाने म्हणाली.

Comments
Add Comment

वाचन गुरू

“काय रे अजय, सध्या पुस्तक वाचन अगदी जोरात सुरू आहे तुझं. हा एवढा बदल अचानक कसा काय घडलाय!” तसा अजय म्हणाला, “काही

अरोरा म्हणजे काय असते?

अरोरा म्हणजे तो ध्रुवांवर पडणारा तेजस्वी प्रकाश. त्याचे आकारही वेगवेगळे असतात. कधी प्रकाश शलाका असतात, तर कधी

आरामदायक क्षेत्र

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ एक गमतीशीर गोष्ट सांगते. उकळत्या पाण्यामध्ये बेडकाला टाकल्यावर तो क्षणात बाहेर

वृत्तपत्रांचे महत्व

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर मानवी जीवनात माहिती, ज्ञान आणि घडामोडींचा मागोवा घेण्यासाठी वृत्तपत्र

वृद्धाश्रम...

कथा : रमेश तांबे सुमती पाटील वय वर्षे सत्तर. वृद्धाश्रमातल्या नोंदवहीत नाव लिहिलं गेलं आणि भरल्या घरात राहणाऱ्या

सूर्य गार भागात का जात नाही ?

कथा : प्रा. देवबा पाटील दुपारच्या सुट्टीत सुभाष आल्यानंतर आदित्य मित्रमंडळाच्या व सुभाषच्या डबा खाता खाता