‘मुस्लीम आरक्षणा’वरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची काँग्रेसवर टीका
रांची: जोपर्यंत भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे, तोपर्यंत या देशात अल्पसंख्याक समुदायाला आरक्षण मिळणार नाही. काँग्रेस पार्टी मुस्लिमांना आरक्षण देण्याचे आश्वासन देत आहे; परंतु संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची कोणतीही तरतूद नाही. आम्ही कधीही कोणत्याही धर्माला विशेष आरक्षण देऊ शकत नाही, अशी रोखठोक भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडत रांची येथे काँग्रेसवर टीका केली.
महाराष्ट्रात उलेमांचा एक गट त्यांच्या काँग्रेसकडे गेला आणि मुस्लिमांना १० टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी त्यांना आश्वासन दिले की, आम्ही यामध्ये तुम्हाला मदत करू. यावर शहा म्हणाले, “काँग्रेस अन्य मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणाविरोधात आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कधीही धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास परवानगी देणार नाही.”
अमित शहा यांनी सांगितले की, मी झारखंडच्या जनतेला विचारायला आलो आहे की, जर मुस्लिमांना १० टक्के आरक्षण दिले गेले, तर कोणाचे आरक्षण कमी होईल?, मागासवर्गीय, दलित आणि आदिवासी यांचे आरक्षण कमी होईल. मात्र, काँग्रेसकडून ओबीसी, आदिवासी आणि दलितांचे आरक्षण हिरावून घेण्याचा प्रयत्न केला
जात आहे.
काश्मीरमध्ये कलम ३७० पुनर्स्थापित करण्याच्या काँग्रेसच्या कथित प्रयत्नांवरही शहा यांनी हल्ला चढवला. शहा म्हणाले, “काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. मी राहुल गांधींना आव्हान देतो की, तुमची चौथी पिढी आली तरी कलम ३७० पुन्हा आणू शकत नाही.