पूर्णिमा शिंदे
आत्मशोध व आत्मबोध होण्यासाठी आत्मपरीक्षण करावे. अवलोकन करावे. अंतर्मुख व्हावे लागते. हे अंतर्मुख होणे म्हणजे ध्यानस्थ स्थितप्रज्ञाची भूमिका. वृत्ती व बुद्धीची शुद्धता हेच आहे. ध्यानाचे फलित. त्यामुळे आपण कोठे आहोत? ते आपल्याला समजते. आपले आचार, विचार, उच्चार यांचीही नव्याने ओळख होते. संस्कृती म्हणजे काय, तर दिव्याला दिवा लावत गेले की, दिव्यांची दीपमाळ आणि माणसाला माणूस जोडत गेला, तर सुंदर अशा माणुसकीचे नाते तयार होते. आपल्या स्वतःचा आत्मोद्धाराचा पेटता दिवा तेवता ठेवण्यासाठी प्रत्येकाच्या मनात तेवत असतो. आकाश दिवा शोध ज्याचा त्यानेच घ्यायला हवा. आत्मस्वरूपाचा आनंद आत्मविश्वासाने आत्मोद्धारासाठी ज्याचा त्यानेच घ्यायला हवा. असा आत्मशोध घेण्यासाठी आत्मबोध घेण्यासाठी काय करावे? थोर महात्म्यांचे विचार, पुस्तके, कादंबरी, चरित्र यांच्याशी विचारांनी एकरूप ,सम व्हावे. ग्रंथ, संदर्भसूची, पुस्तके साहित्य या सगळ्यातून आपण नित्य वाचतो. किती वाचनाने प्रगल्भ झालो तरी; ते वाचन कृतीत जोपर्यंत आणत नाही तोपर्यंत त्या वाचनाचा उपयोग नसतो. फक्त वाचले भाराभर पण ते कृतीत कधी आणणार? संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत बहिणाबाई, स्वामी विवेकानंद, साने गुरुजी, स्वा. सावरकरांपासून आतापर्यंत सर्व लेखकांपर्यंतचे आपण ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक साहित्य निश्चित वाचावे. केवळ वाचू नये. त्यातून आपल्या नोंदी ठेवाव्यात की, मला या पुस्तकातून काय मिळाले, काय लाभले आणि त्याचा व्यवस्थापनासाठी उपयोग करावा, मग ते व्यवस्थापन मनाचे असेल, कलेचे असेल, छंदाचे असेल, आयुष्याचे असेल, जीवनाचे असेल. यामुळे चौकस विचार, प्रगल्भता, विवेक मांडणी आपल्याला या वाचनामुळे लाभते. शब्द भांडार लाभते. पावलो पावली अनिश्चित अशी वेगवेगळ्या तऱ्हेची संकटे उभी असतात. त्या-त्या वेळेला निर्णयक्षमता, ॲक्शन कृती कोणती असावी? हे महत्त्वाचे आहे. आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये वावरताना फार जोखमीने आणि चोखंदळपणे वागावे लागते. आपल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला निवड महत्त्वाची असते. नाण्याला जसा छापा आणि काटा अशा दोन बाजू असतात. त्याप्रमाणे माणसाच्या वागण्याला सुद्धा एक नकारात्मकता आणि सकारात्मकता अशा दोन बाजू असतात. त्यातील आपण आपला मार्ग निवडताना आपल्यामुळे स्वतःला, समोरच्याला, समाजाला इजा होणार नाही असा मार्ग निवडावा. देश, संस्कृती, भाषा, धर्म, शिक्षण यांच्या मुल्यांना तडा जाणार नाही. आपल्या सभ्यता, शालिनीता, सृजनता, विनम्रता गुणसंपदांना तडा जाणार नाही. समाजामध्ये अनेक प्रकारची व्यक्तिमत्व आपण पाहतो. प्रत्येकाची तत्त्व, स्वभाव, व्यवहार अतिशय वेगवेगळे असतात.
आपापल्या सदबुद्धीने आपण चिंतन करून निश्चितच परिवर्तनीय आणि यशाचा आलेख उंचावणारी कामगिरी करावी. हा जनसुखकारक असा निर्णय असावा. कारण जीवन जगत असताना आपण आजूबाजूच्या माणसांचाही तितकाच विचार करायला हवा. आपल्या अवतीभवती असतात ती तत्त्व जोपासली जावी. आणि त्या तत्त्वांमधून उद्भवणारे परिणाम असतील ते कोणालाही दुखावणारे नसावेत. संस्कार मूल्यांपैकी संवेदनशीलता हे संस्कृती जतन व संवेदन संवर्धन करणारे मोठे मूल्य आहे.समृद्ध विचारांच्या माणसांचे नेहमीच पाय जमिनीवर असतात. आपणही आपल्या स्वतःच्या आधी इतरांचा विचार करावा. स्वतःचा विचार पहिला करतो तो स्वार्थी. आणि जो इतरांचा विचार करतो तो निस्वार्थी. यशाकडे वाटचाल करायची असेल, तर वाट पाहू नका. कुठूनही सुरुवात करता येते ती सुरुवात करण्यासाठी तुम्हाला आज या क्षणापासून सुरुवात केली पाहिजे. जास्तीत जास्त लोकांना पाहून अभ्यासून तेव्हा निश्चितच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटतील. चांगले वेचायला शिका. प्रत्येकातील सदगुण वेचायला शिका आणि मग त्या निसर्गामध्ये न्याय आहे. निसर्गाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये, शिकवणुकीमध्ये न्याय आहे. जसे एक गहू पेरला की, अनेक बियांचे कणीस निर्माण होते. तसे आपल्या विचारांचे आहे. आपल्या मनाच्या मशागतीमध्ये आपण कोणत्या प्रकारचे बी पेरत आहोत. यावरून उद्याची लागवड आणि तोडणी असणार आहे. लाभहानीही तुम्हाला आज जे मिळते त्यापेक्षा भविष्यात जास्त हवे असेल, तर आपण अधिकाधिक चांगले वागले पाहिजे. आयुष्यात जी गोष्ट आपल्याला मिळाली नाही ती मिळवण्यासाठी इतरांची मने दुखवून त्याचा काय उपयोग? आपल्या मेहनतीमध्ये स्वतःचा पूर्णपणे शंभर टक्के उत्कृष्ट रिझल्ट देण्याचा हिस्सा हवा. ध्येयाशिवाय वाटचाल म्हणजे बिन शिडाची होडी. प्लॅनिंग, नियोजन असायला हवे. मेहनत, सराव ध्येय, महत्त्वकांक्षा या शक्तीने संपूर्ण ध्येयावर लक्ष केंद्रित करा. कठोर श्रमातून जी इमारत उभी राहते तिला यश म्हणतात. एडिसनची सर्वात मोठी विशेषता जी त्याच्या सर्वोत्कृष्ट गुण महत्त्वाची म्हणजे एकाग्रता. एकदा प्रयोग संशोधन सुरू केला की, ते सापडेपर्यंत थांबायचेच नाही. म्हणूनच की काय १०९३ शोधांचे पेटंट एडिसनच्या नावावर आहेत.वाट कसली पाहत आहात? चला, तर मग सुरुवात करूया! नव्या ध्येयाकडे वाटचालीची आणि यशोशिखर गाठण्याची!! निश्चित ध्येय, ध्येयप्राप्ती, ज्वलंत इच्छा आणि ध्येय मिळेपर्यंत हातची गोष्ट न सोडण्याचा गुण म्हणजे चिकाटी आणि याचेच नाव आहे उत्तम यश.