मेघना साने
बालरंगभूमी परिषद, मुंबई यांच्यातर्फे महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये ऑक्टोबर महिन्यात दिव्यांग महोत्सव साजरा झाला. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक दिव्यांग कलाकारांना व्यासपीठ मिळाले. त्यांच्या शाळांची आणि संस्थांची माहिती जनतेला झाली. ठाण्यामध्ये हे संमेलन करण्यासाठी आमच्या कमिटीने काम सुरू केले तेव्हा दिव्यांग मुलांच्या शाळांबद्दल आणि संस्थांकडून त्यांच्या प्रगतीसाठी केल्या जाणाऱ्या कार्याबद्दल आम्हाला थोडीफार माहिती होती. अशा संस्थांमधे प्रशिक्षित शिक्षक त्यांचा सांभाळ करतात. काही पालक संस्थांमध्ये, तर अशा मुलांच्या निवासाचीही सोय असते. ठाणे आणि आसपासच्या शाळांची माहिती आम्ही संमेलनानिमित्त मिळवत गेलो. प्रगती अंध विद्यालय-बदलापूर, जिजाऊ अंध व मतिमंद मुलांची शाळा-पालघर या शाळांमध्ये गायन वादन कलांचे शिक्षण दिले जाते. आज प्रगती अंध विद्यालयात पंच्याहत्तर विद्यार्थी १ ली ते १०वी शिक्षण घेत आहेत. या शाळेतील एक विद्यार्थ्याने ‘टाय अँड डाय’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत द्वितीय पारितोषिक मिळवले. ठाण्यातील प्रसिद्ध ‘जिद्द’ शाळेत विद्यार्थ्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने वेगवेगळी शिबिरे आयोजित केली जातात. वैद्यकीय शिबिरे हा या शाळेचा अविभाज्य भाग आहे. ‘चैतन्य’ मतिमंद मुलांची शाळा ही मुलांची उद्योगशाळा आहे. येथे पदाधिकारी व कर्मचारी सर्व स्त्रियाच आहेत. या शाळेत थालीपीठ भाजणी, बेसन पीठ ते अगदी शिकेकाई पावडरपर्यंत उत्पादने तयार करायला दिव्यांग मुले झटत असतात. त्यांना कुवतीप्रमाणे स्टायपेंड दिला जातो.
‘सोबती पेरेंट्स असोसिएशन’ ही वाडा येथे बहुविकलांग मुलांची शाळा आहे. त्यांचे वसतिगृह तिळगा गावी आहे. येथेही मुलांना व्यवसाय शिक्षण मिळते. तीव्र व्यंग असलेल्या मुलांच्या संगोपनासाठी पालकांना मदत व्हावी. या हेतूने ही संस्था काम करते. ‘रेनबो फाऊंडेशन, बदलापूर’ येथे मुलांच्या तब्येतीची विशेष काळजी घेतली जाते. गेल्या वर्षी त्यांनी पस्तीस विद्यार्थ्यांना ‘मेनस्ट्रीम स्कुलिंग प्रोग्रॅम’ (मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश) साठी तयार केले. तसेच कागदी लिफाफा बनविण्यापासून ड्रोन बनविण्यापर्यंत अनेक गोष्टींचे प्रशिक्षण त्यांना दिले जाते. ‘कमलिनी कर्णबधिर विद्यालय’, ठाणे येथे कला व्यवसायाच्या माध्यमातून विद्यार्थी विकास साधला जातो. ‘एमबीए फाऊंडेशन’ ही संस्था शारीरिक किंवा बौद्धिकदृष्ट्या विशेष मुलांसाठी काम करते. मुलांची शारीरिक व बौद्धिक क्षमता वाढवण्यापासून ते नोकरीक्षम वयाच्या मुलांना मुख्य प्रवाहात उभे होण्यासाठी ही संस्था मदत करते. ज्यूट, कागद व कापडापासून सुंदर व कलात्मक पिशव्या बनवायला येथील मुलांना शिकवले जाते. ‘आस्था आरोग्यसेवा’ या संस्थेत स्पीच थेरपी, ऑक्युपेशन थेरपी दिली जाते. तसेच हे निवासी अभ्यासकेंद्रदेखील आहे. ‘विश्वास’ मतिमंद मुलांसाठी असलेल्या केंद्रात चित्रकला, नृत्यकला, नाट्यकला यांचे प्रशिक्षण दिले जाते.’चाईल्ड ॲण्ड यू’ ही संस्था स्वमग्न तसेच विकलांग मुलांसाठी काम करते. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक क्षमतेचा शोध घेऊन त्यांची प्रगती घडवून आणते. ‘संतोष इन्स्टिट्यूट फॉर मेंटली चॅलेंज्ड’ या संस्थेत पालकांच्या गरजेनुसार मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी त्यांनी शाखा निर्माण केल्या. सांताक्रूझ, कांदिवली, मीरारोड, डोंबिवली, सीवूड, गोरेगाव, बेलापूर इत्यादी ठिकाणी यांच्या शाखा आहेत. शाळांची माहिती घेताना मला मनीषा सिलम नावाची एक कवयित्री मैत्रीण भेटली. तिने ‘राजहंस’ ही संस्था स्थापन केली होती. तिचा स्वतःचाच मुलगा स्वमग्न आहे. त्यामुळे अशा मुलांसाठी तिने ‘राजहंस’ फाऊंडेशन स्थापन करून त्या मुलांना सांभाळणे व कलागुणांचे शिक्षण देणे सुरू केले. ऑटिझम विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक उपक्रम राबवणे, पालकांना मार्गदर्शन करणे इत्यादी कामे या संस्थेतर्फे केली जातात. तसेच संस्थेचे वोकेशनल सेंटर ८ वर्षांपासून कार्यरत आहे.
‘आत्मन अकादमी’ ही एक अद्वितीय संस्था आहे. जी विशेष सूचनांद्वारे मुलांच्या वैयक्तिक शिक्षणाच्या गरजा पूर्ण करते. या विद्यार्थ्यांना शिक्षण सुविधा देणारे, विशेष शिक्षक, थेरपिस्ट आणि प्रशिक्षित व्यावसायिकांचे अशा पंचवीस जणांचे मार्गदर्शन मिळते आहे.कर्णबधीर मुलेदेखील किती प्रगती करू शकतात, याचे उदाहरण म्हणजे ‘जव्हेरी ठाणावाला’ शाळा. नॉर्मल शाळेतील अभ्यासक्रम या शाळेत राबविला जातो. विशेष म्हणजे या शाळेतील विद्यार्थ्यांनी अबॅकसच्या स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय सुवर्णपदके पटकावली आहेत. ‘जागृती’ ही बौद्धिक सक्षम नसलेल्या प्रौढ व्यक्तींसाठी स्थापन झालेली व पालकांनी चालवलेली संस्था आहे. पर्यावरण पूरक वस्तूंची निर्मिती तसेच क्षमताधिष्ठित कौशल्य विकास असे प्रेरक कार्यक्रम राबविले जातात. समाजामध्ये सन्मानाने स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी विशेष व्यक्तींवरती
विविध कार्यक्रमाचे आयोजन करून संस्कार केले जातात. ‘आस्था आरोग्य सेवा आणि शिक्षण केंद्र’ बदलापूर हे केंद्र दिव्यांग मुलांसाठी विशेष शिक्षण कार्यक्रम प्रदान करत आहे. या संस्थेत स्पीच थेरपी, ऑक्युपेशन थेरपी, ऑटिझम इंटरव्हेंशन आणि प्रशिक्षण दिले जाते. दिव्यांग मुलांच्या पालकांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात.
ठाणे महानगरपालिका शाळा क्र. ६२ ही शाळा घोडबंदर रोडवर कासारवडवली येथे आहे. या शाळेत सामान्य मुलांच्या बरोबरीने दिव्यांग मुलांनाही प्रवेश दिला जातो. सामान्य मुलांबरोबर शिकल्यामुळे या मुलांचा आत्मविश्वास वाढतो. ही मुले वयाच्या अठराव्या वर्षांपर्यंत शिकू शकतात. पण त्यानंतर मात्र पालक संचालित किंवा इतर खासगी संस्थांमध्ये त्यांना दाखल व्हावे लागते. प्रत्येक मुलाची वेगवेगळी गरज व क्षमता ओळखून त्याप्रमाणे त्या मुलांची प्रगती घडवून आणावी लागते. ही मुले पुढे मुख्य प्रवाहातही येऊ शकतात. थोड्या प्रमाणात का होईना, अर्थार्जन करू शकतात. वेगवेगळ्या कला शिकून आपले जीवन सुंदर करू शकतात.