१५ प्रवाशी जखमी, ८ जण गंभीर
मुंबई : पहाटेच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai Pune Highway) भीषण अपघात (Accident News) झाल्याची बातमी समोर आली आहे. कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या खासगी बसची आणि ट्रकची जोरदार धडक झाल्याने हा अपघात घडला. यामध्ये १५ प्रवाशी जखमी झाले असून त्यामधील ८ जण गंभीर जखमी असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खोपोलीजवळ पहाटे चार वाजेच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर हा अपघात घडला. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडकली. या भीषण अपघातामध्ये १५ प्रवाशी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ८ जणांची प्रकृती चिताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, आयआरबी यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी गृप , देवदूत यंत्रणा , वाहतूक पोलीस अपघात ठिकाणी दाखल झाले. तात्काळ बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी वाहतूककोंडी निर्माण झाली होती. परंतु सध्या वाहतूक सुरळीत सुरु असल्याची माहिती मिळत आहे.