युवराज अवसरमल
मराठवाड्याची मानसकन्या म्हणून लोकांनी गौरवलेली व विनोदाची उत्तम जाण असलेली, आपल्या एन्ट्रीने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता हणमघर. दादरच्या शारदाश्रम शाळेत तिचे शालेय शिक्षण झाले. गॅदरिंगच्या वेळी तिच्या शाळेत नाट्यस्पर्धा असायची, त्यावेळी नाटकात तिने काम केले होते. तिचे लहान पणापासून प्रसिद्ध होण्याचे स्वप्न होते. तिथून तिला नाटकाविषयी प्रेम निर्माण झाले. त्यानंतर तिने रुईया कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथे नाट्य स्पर्धेत तिने भाग घेतला. श्रीरंग गोडबोले यांची ‘घडलंय बिघडलंय’ ही तिची पहिली मालिका होती. त्यानंतर तिने श्रीरंग गोडबोले यांच्या अनेक मालिकेमध्ये काम केले.’कॉमेडीची बुलेट ट्रेन’ ही मालिका तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरली. त्यामध्ये ती मराठवाड्यातील बोली भाषा सादर करायची. खरंतर तिचे कुणीही मराठवाड्यात नाही, तरीदेखील त्या बोलीभाषेमुळे तिने प्रेक्षकांची मने जिंकली होती. प्रेक्षकांनी तिला मराठवाड्याची बुलेट असे देखील म्हटले आहे. तिला मराठवाड्याची मानस कन्या देखील म्हटले जाते.त्यानंतर ‘तिने बस्ता’, ‘धुरळा’, ‘लूज कंट्रोल’, ‘गोष्ट एका पैठणीची’, ‘हवा हवाई’ हे चित्रपट केले.
या वर्षात तिचा ‘राजकारण गेलं मिशित’, ‘लेक असावी अशी’ हे चित्रपट रिलीज झाले. ‘पाणीपुरी’ हा तिचा नवीन चित्रपट लवकरच रिलिज होणार आहे. या चित्रपटामध्ये आर्ची हे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव आहे. अभिनेते भारत गणेशपुरे यांच्या पत्नीची भूमिका तिने साकारली आहे. सगळ्या नवरा-बायकोमधील संबंध प्रातिनिधिक स्वरूपात त्याच्यात पाहायला मिळणार आहे. पाणीपुरीमध्ये जशा सगळ्या चवी असतात. त्याप्रमाणे नवरा बायकोच्या नात्यामध्ये सगळ्या चवींचा समावेश असतो. ते नाते कधी गोड असते, कधी तिखट असते, तर कधी कडू असते. जसे पाणीपुरीमध्ये सगळ्या चवी एकत्र आल्या, तर ती रुचकर लागते, त्याप्रमाणे संसारामध्ये समतोल साधला, तर तो चांगला होता. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल असा आशावाद तिने व्यक्त केला. कारण प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनातील प्रश्न यामध्ये पाहायला मिळेल. प्रेक्षक स्वतःला या चित्रपटाच्या कथेत पाहतील. नवरा-बायको हा समाजाचा स्थायीभाव आहे. प्रेम आपल्याला जन्मतःच मिळालेले असते. लग्नसंस्था आपणच निर्माण केलेली आहे. ती आनंदी करण्याचे आपल्याच हाती असते, असे तिचे म्हणणे आहे. या चित्रपटामध्ये दोन गाणी आहेत.
रंजना ही तिची आवडती अभिनेत्री आहे. तिच्या सारख्या भूमिका करायला मिळाव्यात असे तिला वाटते. तिला वाचन, स्वयंपाक करायला, फिरायला आवडते, नवीन लोकांना भेटायला आवडते. आयुष्यात ज्या गोष्टी केल्याने आपण पुढे जाऊ शकतो, त्या गोष्टी करायला तिला आवडतात, तेच तिचे छंद आहेत. आगामी ‘पाणीपुरी’ या चित्रपटाच्या यशासाठी तिला
हार्दिक शुभेच्छा!