महाराष्ट्र राज्यात आगामी विधानसभेच्या निवडणुका २० नोव्हेंबर, २०२४ रोजी होत आहेत. तेव्हा भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मतदार राजाला जागृत केले आहे. त्यावेळीडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, “तुमच्या मतांची किंमत मीठ-मिरची इतकी समजू नका. त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल तेव्हा ते मत विकत घेऊ पाहणाऱ्यांइतके कंगाल कोणीच नसेल”. नंतर पश्चाताप करून घेण्यापेक्षा आजच मतदाराने जागृत राहिले पाहिजे. तसेच २३ डिसेंबर १९५१ रोजी मुंबईतील जाहीर सभेत “निवडणुका नि:पक्षपाती होण्याची गरज” असे म्हणाले होते. तेव्हा आपल्या देशातील लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी योग्य उमेदवाराला मतदानाच्या दिवशी मतदान करायला हवे. त्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन मतदार जागृती करणे ही आजच्या काळाची खरी गरज आहे.
रवींद्र तांबे
देशात १८व्या लोकसभेच्या निवडणुका १९ एप्रिल ते १ जून, २०२४ दरम्यान सात टप्प्यात घेण्यात आल्या होत्या. याचा निकाल ४ जून २०२४ रोजी जाहीर झाला. आपल्या महाराष्ट्र राज्यातील निकालाचा विचार करता राज्यात सरासरी ६१.२९ टक्के निकाल लागला. मात्र एकाही जिल्ह्यात १०० टक्के मतदान झाले नाही. महाराष्ट्र राज्यातील ४८ मतदारसंघातील मतदानाचा अभ्यास केल्यास सर्वात जास्त मतदान गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के, तर सर्वात कमी मतदान मुंबई दक्षिण मतदारसंघात ५०.०६ टक्के मतदान झाले. महाराष्ट्र राज्यात हे मतदान पाच टप्प्यांत घेण्यात आले होते. आपल्या राज्यात सध्या विधानसभेच्या निवडणुकांचा रणसंग्राम जोरात चालू आहे. राज्यात २८८ विधानसभा मतदारसंघ असून विधानसभेच्या निवडणुका विविध टप्प्यांत न होता दिनांक २० नोव्हेंबर, २०२४ रोजी एकाच टप्प्यात होत आहे.
राज्यामध्ये मतदार राजांचा विचार करता राज्यात ९,७०,२५,११९ एकूण मतदार आहेत. त्यासाठी निवडणूक आयोग दिवाळीच्या उत्सवाबरोबर राज्यातील निवडणुकीचा उत्सव कशाप्रकारे शांततेत पार पडेल व मतदानाची टक्केवारी कशी वाढेल या दृष्टीने सुट्टीच्या दिवशीसुद्धा निवडणूक कर्तव्यावर असणारे सेवक वर्ग घड्याळ्याच्या काट्याकडे न पाहता काम करीत आहेत. तसेच राज्यातील मतदान अधिक सुलभ पद्धतीने व्हावे यासाठी विविध समित्या स्थापन करून समित्यांच्या मार्फत काम चालू केले आहे. या समित्यांमध्ये विविध कार्यालयातील सेवक वर्ग एकत्र गुण्यागोविंदाने काम करताना दिसत आहेत. मतदारांमध्ये जागृती होण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने देशात दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र या दिनाचे तरुण पिढीला काहीही देणे-घेणे नसते. आपल्या देशात लोकशाही आहे. निवडणुका हा लोकशाही प्रक्रियेचा मुख्य भाग आहे. मतदारसंघातील समस्या सोडविण्यासाठी प्रतिनिधी निवडून दिले जातात. तेव्हा आपल्या मतदारसंघाचा विचार करून मतदार राजाने निवडणुकीच्या दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आपल्या मतदार केंद्रावर जाऊन कोणाच्याही आश्वासनांना बळी न पडता आपल्या समस्या जो उमेदवार अगदी प्रामाणिकपणे सोडवेल त्याला आपले गोपनीय मत द्यावे. आपल्या देशातील १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे.
त्याप्रमाणे निवडणूक आयोगाकडे नोंदणी करून आयोगाचे ओळखपत्र घ्यावे. जरी आयोगाचे ओळखपत्र नसले तरी पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, केंद्र अथवा राज्य शासकीय सेवकांचे ओळखपत्र, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, खासगी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबूक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्टकार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, निवृत्तिवेतनाची दस्तावेज, संसद, विधानसभा, विधान परिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, आधारकार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र आणि कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्टकार्ड हे मतदानासाठी ग्राह्य पुरावे धरले जाणार आहेत. तेव्हा यापैकी एक जरी पुरावा असेल तरी मतदान करता येणार आहे. त्यासाठी त्यांचे मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. तेव्हा महाराष्ट्र राज्यातील १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान केलेच पाहिजे.
महत्त्वाची बाब म्हणजे, राज्याच्या विकासाच्या दृष्टीने नेता निवडावा तो सुद्धा सक्षम असावा. त्याला स्वत:चे निर्णय स्वत: घेता आले पाहिजेत, अशा खंबीर नेत्याला मतदान करावे. तसेच तरुणांनी आपल्या राज्याच्या विकासासाठी नि:पक्षपातिपणे जो काम करतो त्यालाच मतदान करा अशी मतदारांमध्ये जागृती करावी. प्रसिद्धी माध्यमाद्वारे जाहिरात करणे, मतदानाचे महत्त्व मतदार राजाला समजण्यासाठी त्या अानुषंगाने पथनाट्य, सार्वजनिक ठिकाणी घोष वाक्य लिहिणे, मतदानाच्या संदर्भात पत्रके वाटावीत. तसेच एक व्यक्ती एक मत याची जाणीव करून द्यावी. त्यामुळे मतदार राजाला आपल्या एका मताची किंमत समजेल. यावेळच्या विधानसभेच्या निवडणुका अतिशय चुरशीच्या होणार आहेत. तेव्हा निवडणुकीच्या दिवशी मतदाराने कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली न राहता आपल्या हक्काची जाणीव करून आपला मतदानाचा हक्क बजावावा.
मतदान हा देशातील प्रत्येक मतदाराला भारतीय राज्य घटनेने दिलेला अधिकार आहे. त्याची कुठेही पायमल्ली होता कामा नये. तरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारी लोकशाही आपल्या देशात नांदेल. तेव्हा मतदानाची जाणीव मतदार राजाला करून दिली पाहिजे. त्यासाठी देशातील लोकशाही प्रगल्भ होण्यासाठी प्रत्येक मतदार राजाने राज्याच्या हिताच्या दृष्टीने २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे.