उत्तर प्रदेश : माणुसकी नावाची गोष्टीचं राहिली नाही… उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे दोन महिलांनी माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केल आहे. खरं तर या महिलांना कुत्र्याच्या पिल्लांचा आवाज सहन न झाल्यामुळे त्यांनी धक्कादायक घटना घडवून आणली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपी महिलांना कुत्र्याच्या ५ पिल्लांच्या आवाजाचा त्रास होत होता म्हणून त्यांनी पिल्लांना जिवंत जाळले आणि त्यांना गाढून टाकण्याचा प्रयत्न केला. स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी एफआयर नोंदवला असून, पुढील तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितले.
या २ महिला आरोपींनी लहान पिल्लांवर पेट्रोल टाकून त्यांचा जीव घेतला. मेरठमधील कांकरखेडा परिसरात ही घटना घडली. आरोपी महिला राहत असलेल्या घराजवळील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, तिथे राहणाऱ्या भटक्या कुत्र्याची लहान पिल्ले खूप जोरात ओरडत होती. त्यांचा आवाज सहन न झाल्याने संबंधित महिलांनी त्यांना ठार केले.
माणुसकीला काळीमा फासणारी घटना
वरिष्ठ पोलीस अधिकारी जितेंद्र कुमार यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक अंशुमली यांच्या तक्रारीवरुन २ महिलांविरोधात एफआयर नोंदवण्यात आला आहे. आरोपी शोभा आणि आरती या दोघींची अधिक चौकशी सुरू आहे. या दोघींवर भारतीय दंड संहिता कलम ३२५ अंतर्गत मुक्या प्राण्यांना त्रास दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही अधिक माहिती घेत असून आरोपींवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. ५ नोव्हेंबरला रोहता रोडजवळील संत नगर कॉलनीत ही घटना घडली. एका भटक्या श्वानाने अलीकडेच ५ पिल्लांना जन्म दिला. त्यांचा आवाज सहन न झाल्याने आरोपींनी पेट्रोल टाकून जाळले.