कोलकाता : देशभरात रेल्वे अपघातांचे (Railway Accident) सत्र सुरूच असल्याचे दिसून येते. आज पुन्हा पश्चिम बंगालमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. सिकंदराबाद-शालीमार सुपरफास्ट एक्स्प्रेसचे (Shalimar-Secunderabad Express accident) चार डबे रुळावरुन घसरुन भीषण अपघात घडला आहे. यामध्ये अनेक प्रवाशी जखमी झाले असून जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास कोलकाता सिकंदराबाद-शालीमार सुपरफास्ट एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक २२८५०) मध्य मार्गावरून डाऊन लाइनकडे जात असताना एका पार्सल व्हॅनसह इंजिन आणि दोन डबे रुळावरून घसरले. या अपघातात कोणतीही मोठी हानी झाली नाही. मात्र काही प्रवासी जखमी झाले आहेत.
सध्या अपघातस्थळी, संतरागाछी आणि खरगपूर येथून अपघात मदत ट्रेन आणि वैद्यकीय मदत गाड्या तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना कोलकात्याला नेण्यासाठी बसही पाठविण्यात आल्या आहेत, अशी माहिती दक्षिण-पूर्व रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) ओमप्रकाश चरण यांनी दिली.