मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी भोपाळमधील भाजपाच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर (Sadhvi Pragya Thakur) यांचा एनआयए न्यायालयाने जामीन मंजूर केला असून १३ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. मात्र अशातच साध्वी प्रज्ञा यांनी सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर करत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी त्यांच्या सूज आलेल्या चेहऱ्याचा एक फोटो एक्स अकाउंटवरून शेअर केला आहे. यामध्ये ‘काँग्रेसचं टॉर्चर हे फक्त एटीएसच्या कोठडीपुरते मर्यादित नाही. माझ्यासाठी या आयुष्यभराच्या मरण यातना आहेत. मेंदूला सूज, डोळ्यांनी कमी दिसणं, कमी ऐकू येणं, बोलण्यात एकसारखेपणा नसणं या सगळ्या गोष्टी मी सहन करते आहे. स्टेरॉईड आणि न्यूरो संबंधीच्या औषधांनी माझं सगळं शरीर सुजलं आहे. एका हॉस्पिटलमध्ये माझ्यावर उपचार सुरु आहेत. मी जर जगले वाचले ना तर न्यायालयात नक्की जाईन’ असे त्यांनी म्हटले आहे.
#कांग्रेस_का_टॉर्चर सिर्फ ATS कस्टडी तक ही नहीं मेरेजीवन भर के लिए मृत्यु दाई कष्ट का कारण हो गएl ब्रेन में सूजन,आँखों से कम दिखना,कानो से कम सुनना बोलने में असंतुलन स्टेरॉयड और न्यूरो की दवाओंसे पूरे शरीर में सूजन एक हॉस्पिटल में उपचार चल रहा हैl जिंदा रही तो कोर्ट अवश्य जाउंगीl pic.twitter.com/vGzNWn6SzX
— Sadhvi Pragya Singh Thakur (@sadhvipragyag) November 6, 2024
दरम्यान, साध्वी प्रज्ञा यांचा मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात कोर्टात अंतिम युक्तिवाद सुरू आहे. परंतु सध्या त्यांना प्रकृतीच्या कारणामुळे जामीन देण्यात आला आहे. मात्र न्यायालयाने प्रज्ञा ठाकूर यांना १३ नोव्हेंबर रोजी हजर होण्याचे आदेश दिले आहेत.