Friday, December 13, 2024
Homeमहत्वाची बातमीराहुल गांधी म्हणजे खोटं बोलणारी फॅक्टरी

राहुल गांधी म्हणजे खोटं बोलणारी फॅक्टरी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हल्लाबोल

सातारा : कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तेलंगणाच्या निवडणुकीत काँग्रेसने आश्वासनांचे पेटारे उघडले आणि निवडणुका जिंकल्या. परंतु,आश्वासने पाळली नाहीत. आता सांभाळून आश्वासने द्या, असे काँग्रेससारख्या राष्ट्रीय पार्टीचा अध्यक्ष असे म्हणत असेल तर ती पार्टी आश्वासन पाळू शकते का? असा सवाल करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी (Amit Shah) काँग्रेसवर हल्लाबोल केला. राहुल गांधी ही खोटं बोलणारी फॅक्टरी आहे. तरूणांनी त्यांच्या नादी लागू नये, असे आवाहनही शाह यांनी केले.

कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारसभेत बोलताना अमित शाह म्हणाले की, “अग्निवीर ही तरूणांना बेकार करणारी नाही तर सैन्य दलाला तरूण करणारी योजना आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक अग्निवीराला परत आल्यानंतर केंद्र सरकार सीएपीएफ आणि महाराष्ट्र सरकार पेन्शनची नोकरी देईल. हे भाजपाचे आश्वासन आहे आणि मोदींची आश्वासने फसवी नसतात. मोदी बोलतात ते करतात.”

अयोध्येतील राम मंदिराचा विषय काँग्रेसनं ७५ वर्षे लटकवत,भटकवत ठेवल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. “नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही अयोध्यामध्ये मंदिराचं भूमीपूजन करून थांबलो नाही, तर मंदिर बांधून दाखवलं. जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटवल्यानंतर सर्व विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. ३७० कलम पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव कॉंग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने आणला असला तरी राहुल गांधींची चौथी पिढीसुध्दा ३७० कलम पुन्हा लागू करू शकणार नाही,” असा सज्जड इशाराच शाहांनी दिला.

“जम्मू-काश्मिरमधील दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा पुरावा मागणाऱ्यांनी टीव्हीवर पाकिस्तानी नेत्यांची पडलेली तोंड पाहिली असती तरी पुरावे मिळाले असते,” असा उपरोधिक टोला अमित शाहांनी राहुल गांधींना लगावला. “तसेच मागील निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीला बहुमत मिळालं होतं. परंतु, शिवसेनेनं जनादेशाला धोका दिला. हिंदुत्ववाद्यांना पाखंडी म्हणणाऱ्या, श्रीराम मंदिराला विरोध करणाऱ्यांसोबत बाळासाहेबांचे वारसदार जाऊन बसले,” अशी टीका त्यांनी उध्दव ठाकरेंवर केली. “शरद पवार या वयात देखील खोटं बोलतात. राज्यात गुंतवणूक आली नसल्याचे ते सांगत आहेत. वास्तविक देशात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक ही महाराष्ट्रात झाली असल्याचं अमित शाहांनी ठणकावून सांगितलं. महायुतीच्या काळात समृध्दी महामार्ग, मेट्रो, कृष्णा-भीमा स्थिरीकरण, महिला, शेतकरी, तरूणांसाठी योजना राबवल्या. त्यासारखं महाविकास आघाडीच्या काळातील एखादं काम शरद पवारांनी सांगावं,” असं आव्हानही शाह यांनी दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -