नाशिक :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेचे आयोजन शुक्रवारी, ८ नोव्हेंबरला येथील तपोवन मैदानावर करण्यात आले असून किमान एक लाख जनसमुदाय उपस्थित राहिल याचे नियोजन स्थानिक भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.
सभेची वेळ भर दुपारची असल्याने जलरोधक तंबूमध्ये लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह महायुतीचे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दृकश्राव्य माध्यमातून गुरुवारी सभेच्या तयारीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील मालेगाव मध्य वगळता सर्व १४ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सभेला उपस्थित राहतील.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर मोठ्या नेत्याची आणि त्यातही थेट पंतप्रधानांचीच पहिली सभा शहरात होत असल्याने तिच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी आणि शुक्रवारी शहरातील वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.
सभेच्या ठिकाणापासून दूरवर लोकांना वाहने पार्क करावी लागणार आहेत. मात्र, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे आवश्यक ठरले आहे. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात वाहने आणि कार्यकर्ते या सभेसाठी येणार असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ही काळजी घेण्यात आली आहे.