उदय पिंगळे
अधिकाधिक लोकांनी आयकर विवरणपत्र भरून आपले सर्व मार्गांनी मिळवलेले उत्पन्न जाहीर करावे आणि नियमानुसार सवलती घ्याव्यात आणि लागू असल्यास योग्य कराचा भरणा करावा अशी सरकारची अपेक्षा आहे. त्यासाठी काही विशिष्ट रकमेच्या व्यवहारांवर मुळातून करकपात केली जाते. ही करकपात दोन पद्धतीने होते.
१. टीडीएस (Tax Deducted at Source)
२. टीसीएस (Tax Collected at Source)
जरी या दोन्ही पद्धतीने मुळातून करकपात केली जात असली तरी त्यात सूक्ष्म फरक आहे. टीडीएस हा विविध देयकांवर लावला जातो. उदा. व्याजाचे उत्पन्न, पगार, डिव्हिडंड, कमिशन, लॉटरी. टीडीएस कापणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेस कपातकर्ता असे म्हणतात. टीसीएस वस्तू आणि काही सेवांच्या विक्रीवर लागू होतो. उदा. मानवी वापरासाठी विकलेले मद्य, दोन लाखांहून अधिक रकमेचे सोने अथवा दागिने यांची विक्री. ५० लाखांहून अधिक रकमेचे स्थावर मालमत्तेचे व्यवहार. टीसीएस कापून घेणाऱ्या व्यक्तीला कलेक्टर म्हणतात. दोन्ही कर करदात्यांच्या वतीने सरकारकडे विहित मुदतीत जमा केले जातात. कापलेल्या टीडीएसबद्दल फॉर्म १६ आणि १६AA या स्वरूपात कापलेल्या कराचे प्रमाणपत्र कपातकर्त्याकडून करदात्यांना दिले जाते. फॉर्म १५G किंवा H भरून दिल्यास करदेयतेची जबाबदारी कपात रस्त्यावर न येता पूर्णपणे करदात्यावर येते, त्यामुळे ज्यांना आपली करदेयता माहीत आहे त्याचीच हा फॉर्म भरून द्यावा. कपात करणारे अनेकदा फॉर्म भरायला सांगून आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करीत असतात.
टीसीएस कापणाऱ्या व्यक्तीने फॉर्म २७ D मध्ये कापलेल्या कराचे प्रमाणपत्र करदात्यास दिले पाहिजे. तो कमी दराने कापवायचा असल्यास फॉर्म १३ भरून त्यावर सक्षम आयकर अधिकाऱ्यांची मान्यता घेतल्यास कमीदराने अथवा शून्यदराने कपात करता येईल. अशा रीतीने मुळातून करकपात केली जात असली तरी त्याचा करदात्यांच्या एकूण करदेयतेशी संबंध असेलच असे नाही. जर व्यक्तीचे एकूण करपात्र उत्पन्न विहित मर्यादेहून कमी असल्यास विवरणपत्र भरून दिल्यावर सदर करदात्याला कापलेला जास्तीचा कर परत केला जातो. थोडक्यात करदेयता आणि करकपात या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. पगारदार व्यक्तींचा अन्य ठिकाणी मुळातून कर कापला गेल्याने त्याची एकंदर करदेयता कमी होत असेल, तर तशी कर सवलत पगारातून मिळायला हवी अशी करदात्यांची मागणी होती. मालकांना ते वाढीव काम वाटत होते त्यामुळे त्याच्याकडून फारसे लक्ष दिले जात नव्हते. ही मागणी सरकारला रास्त असल्याचे जाणवल्याने त्यास प्रतिसाद म्हणून २३ जुलै रोजी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पगारदारांच्या अन्य उत्पन्नातून मुळातून कर कपात झाली असल्यास त्याचा तपशील आपल्या मालकास दिल्यास त्या उत्पन्नाचा आणि पगाराचा एकत्रित विचार करून कर कपात केली जाईल असे जाहीर केले होते. त्यामुळे मुळातून कापून घेतलेला कर आपोआपच समायोजित होईल आणि कमी कर कापला जाईल, असा यामागचा हेतू आहे. यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर नियंत्रण मंडळाने फॉर्म १०BAA चा नमुना १५ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रकाशित केला आहे सदर फॉर्म भरून दिल्यास त्याचा विचार करून मालकाकडून त्याप्रमाणे कर आकारणी करणे बंधनकारक आहे. या फॉर्ममध्ये करदात्याचे नाव, पॅन, कर निर्धारण वर्ष यांसह, टीडीएसच्या संदर्भात –
१. कोणत्या कलमानुसार कर आकारणी केली
२. कपातकर्त्याचे नाव, पत्ता आणि टॅन क्रमांक
३. कापलेला कर
४. मिळालेले उत्पन्न
ही माहिती करदात्याने भरायची आहे, तर
टीसीएसच्या संदर्भात –
१. कोणत्या कलमाखाली कर आकारणी केली
२. कलेक्टरचे नाव, पत्ता आणि टॅन क्रमांक
३. कापलेला कर
झालेला व्यवहार अथवा दिलेल्या सेवेचा तपशील याशिवाय टीडीएस/टीसीएस इतर आवश्यक तपशील आणि घराच्या संबंधित तोटा म्हणजे गृह कर्जावरील दिलेल्या व्याजाचा तपशील असल्यास द्यायचा आहे. आजपर्यंत मालकवर्ग दिलेला पगार, भत्ते आणि नोकराने केलेली पगारातील व बाहेरील गुंतवणूक यांचा विचार करून करकपात करीत असत. आता नव्या कायदेशीर तरतुदीनुसार टीडीएस आणि टीसीएसमधील कापला गेलेला कर वरील फॉर्मनुसार भरून दिल्यास, दिलेला तपशील विचारात घेऊन करकपात होणार असल्याने अनेकांची एकंदरीत करदेयता कमी होऊ शकते आणि जास्त पैसे हातात राहू शकतात. तरी विहित नमुन्यात आणि निर्धारित कालावधीत नोकरदारांनी फॉर्म 12 BAA आपल्या मालकास भरून देणे हिताचे आहे. शासकीय राजपत्रात प्रकाशित झालेला फॉर्मचा नमुना संकेतस्थळावर उपलब्ध आहे तो डाऊनलोड करून घेता येईल.