मिझोराम प्रीमियर लीगमध्ये सहभागी २४ फुटबॉलपटू, ३ क्लबवर बंदी
नवी दिल्ली : भारतीय फुटबॉल जगतात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. फुटबॉलमधील मॅच फिक्सिंगमुळे खळबळ उडाली आहे. यामध्ये केवळ खेळाडूच नाही तर काही संघही मॅच फिक्सिंगमध्ये सामील होते. यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. मिझोराम फुटबॉल असोसिएशनने नुकत्याच आयोजित केलेल्या मिझोराम प्रीमियर लीग-११ मध्ये मॅच हेराफेरी केल्याबद्दल तीन संघ, तीन संघाचे अधिकारी तसेच २४ खेळाडूंवर मोठी कारवाई केली आहे. तर काही खेळाडूंवर आजीवन बंदीही घालण्यात आली आहे.
मिझोराम फुटबॉल असोसिएशनने एका निवेदनात म्हटले आहे की, स्थानिक कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींच्या पाठिंब्याने त्यांनी लीगमधील भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणली. “या निष्कर्षांचा परिणाम म्हणून आम्ही या प्रकरणात गुंतलेल्यांना कठोर दंड ठोठावला आहे. आम्ही स्टेकहोल्डर्सना आश्वासन देतो की, या क्रियाकलापांमध्ये सहभागी असल्याचे आढळलेल्या क्लबला, त्यांच्या भविष्यातील स्पर्धांमधील सहभागावर परिणाम करणाऱ्या निर्बंधांना सामोरे जावे लागेल आणि यात सहभागी खेळाडू आणि अधिकारी यांच्यावर एमएफएव्दारे योग्य मानले जाणारे निलंबन आणि इतर अनुशासनात्मक केले जाईल.
या संघांवर घातली बंदी
मिझोरम प्रीमियर लीगमधील सामन्यांच्या निकालांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी तीन क्लब-सिहफिर वेंगलून एफसी, एफसी बेथलेहेम आणि रामहलून ॲथलेटिक एफसी-तीन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे.
बंदी घातलेले खेळाडू
रामहुन ॲटलेटिको एफसीचा लीग टॉप स्कोअरर फेलिक्स लालरुतसांगा. ज्याने आठ गोल केले होते. त्याचबरोबर चार खेळाडूंवर पाच वर्षांची बंदी, १० खेळाडूंवर तीन वर्षांची आणि आठ खेळाडूंवर एक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. मिझोराम फुटबॉल असोसिएशनने हे मान्य केले की, या घोटाळ्यामुळे लीगच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचू शकते.
एमएफएने जाहीर केलेल्या यादीनुसार बंदी घालण्यात आलेले बहुसंख्य खेळाडू सिहफिर वेंगलून एफसीचे होते, ज्यात २४ पैकी १४ खेळाडू होते.
मेघालयमध्येही कारवाई
मेघालय फुटबॉल असोसिएशनने मिझोराममधील दोन फुटबॉलपटूंना सध्या त्यांच्या राज्यात मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याबद्दल सध्या शहर-आधारित फुटबॉल क्लब नॉन्गकीव इराट एफसीकडून सध्या सुरू असलेल्या शिलाँग प्रीमियर लीगमध्ये खेळण्यास प्रतिबंधित केले आहे. मिझोराम फुटबॉल असोसिएशनकडून या खेळातील बेकायदेशीर कृत्यांसाठी बंदी घालण्यात आलेल्या २५ खेळाडूंपैकी फ्लेवियस लालरुआकिमा आणि सी व्हॅनलालह्रिटा यांचा समावेश आहे. मेघालय फुटबॉल असोसिएशनने असा संदेश दिला आहे की, खेळाडूंनी अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतू नये.