माध्यमांत छापून आलेल्या बातमीचे छगन भुजबळांनी केले खंडन
वकीलांशी चर्चा करुन योग्य ती कार्यवाही केली जाईल
नाशिक : मी कुठलीही मुलाखत दिलेली नाही किंवा मी कुठलेही पुस्तक लिहिलेले नाही. तसेच ईडीपासून वाचण्यासाठी आम्ही सत्तेत सहभागी झाल्याचा आरोप हा केवळ आज नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मला तुरुंगात जाण्याची कुठलीही भीती नाही. बातमीत जे काही प्रसिद्ध झाले तसे मी काहीही बोललेलो नाही. आम्ही विकासासाठीच सत्तेत सहभागी झालेलो आहोत. महाराष्ट्र सदन प्रकरणात न्यायालयाने मला क्लीन चीट दिलेली आहे. ते सुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मी मंत्रिमंडळात होतो. त्यावेळीच न्यायालयाचा निकाल आलेला आहे. त्यामुळे शंका घेण्याची किंवा संभ्रम होण्याची काहीही गरज नाही’, असे स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माध्यमांत छापून आलेल्या बातमीचे खंडन केले.
भुजबळ पुढे म्हणाले की, ‘पत्रकार राजदीप सरदेसाई यांचे पुस्तक मी पाहिलेले किंवा वाचलेले नाही. तसेच, या पुस्तकात काय प्रसिद्ध झालेले आहे ते सुद्धा मी पाहिलेले नाही. मात्र, हे पुस्तक मी घेणार आहे. तसेच, माझ्या वकीलांनाही देणार आहे. त्यानंतर वकीलांशी चर्चा करुन मी पुढील योग्य ती कार्यवाही करणार आहे. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर असे का छापले? त्यांचा उद्देश काय आहे?’ असा प्रश्नही भुजबळ यांनी उपस्थित केला.
ईडीच्या कारवाईबाबत बोलताना भुजबळ यांनी सांगितले की, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे आम्ही ५४ आमदार आहोत. या सर्वांवरच ईडीने कारवाई केलेली नाही. त्यामुळे शंका निरर्थक ठरते. तसेच, ईडीची कारवाई ही काही विशिष्ट समाजाच्या नेत्यांवरच झाली असे म्हणणेही चुकीचे आहे. महायुती सरकारने अतिशय दमदार कामगिरी केली आहे. मतदारसंघांमध्ये कोट्यवधींची कामे होताना पाहून जनताही खुष आहे. जनतेला विकास हवा आहे. निवडणुकीत जनता महायुतीच्या बाजूने आहे’, असेही भुजबळ यांनी ठामपणे सांगितले.
महाराष्ट्राचे हित आणि विकासासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ आमदार माझ्यासह एकत्र आले. सर्वांनी पक्षप्रमुख अजित पवार यांना पत्र दिले. त्यानंतर आम्ही महायुतीमध्ये सहभागी झालो. परिणामी, आज राज्यात कोट्यवधींची विकासकामे सुरू आहेत. माझ्या एकट्या येवला मतदारसंघातच तब्बल दोन हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. जनता त्यावर बेहद्द खुश आहे, अशी माहिती भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.