सोलापूर: पंढरपूर येथे होणार्या कार्तिकी यात्रेत भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने बिदर-पंढरपूर-बिदर, आदिलाबाद-पंढरपूर-नांदेड आणि नांदेड-पंढरपूर-आदीलाबाद अशा तीन विशेष एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत विविध स्थानकावरून पंढरपूरला जाणार्या भक्तांची सोय होणार आहे.कार्तिकी शुद्ध एकादशी ही मोठी एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपासाचे व्रत करतात. कार्तिकी एकादशी १२ नोव्हेंबरला आहे.
दरम्यान विठ्ठल भक्तांची पंढरपूरला जाण्याची सोय व्हावी यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे.बिदर-पंढरपूर ही गाडी बिदर येथून ११ नोव्हेंबरला रात्री सव्वादहा वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसर्या दिवशी सकाळी सहा वाजून २० मिनिटांनी पोहोचेल. तर, १२ नोव्हेंबरला पंढरपूर येथून रात्री आठ वाजता सुटेल आणि बिदर येथे दुसर्या दिवशी पहाटे साडेचार वाजता पोहोचेल. या गाडीस अनारक्षित १० डबे असतील.