नवी दिल्ली : वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफवर २ सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. क्रिकेट वेस्ट इंडीजने कर्णधार शाई होपवर फिल्ड प्लेसमेंटवरून वाद घातल्याबद्दल बंदी घातली आहे. २७ वर्षीय वेगवान गोलंदाज जोसेफने सामन्याच्यावेळी मैदान सोडले.क्रिकेट वेस्ट इंडीजने गुरुवारी एका निवेदनात म्हटले आहे की, जोसेफचे वर्तन सी डब्ल्यूआयच्या व्यावसायिकतेच्या मानकांनुसार नव्हते.
या प्रकरणावरून जोसेफने माफी देखील मागितली. ज्यामध्ये जोसेफने असे म्हटले होते की, मी कर्णधार शाई होप आणि माझे सहकारी आणि व्यवस्थापन यांची वैयक्तिक माफी मागितली आहे. मी वेस्ट इंडिजच्या चाहत्यांसाठी माझी मनापासून माफी मागतो, कृपया समजून घ्या की, निर्णयात थोडीशी चूक देखील दूरगामी परिणाम करू शकते. घडलेल्या घटनेबद्दल मला मनापासून खेद आहे. वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ वेस्ट इंडिज-इंग्लंड तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान कर्णधार शेन होपशी वाद घालताना दिसला.
कर्णधार शेन होपने सेट केलेले क्षेत्ररक्षण त्याला पटले नाही, जेव्हा त्याने कर्णधाराला ते बदलण्यास सांगितले तेव्हा होपने नकार दिला. त्यामुळे तो संतापून मैदानाबाहेर पडला. यानंतर वेस्ट इंडिजचा संघ एका षटकापर्यंत १० क्षेत्ररक्षकांसह खेळत राहिला. मात्र, नंतर तो मैदानात परतला.
‘अल्झारीचे वर्तन क्रिकेट वेस्ट इंडिजच्या मूलभूत मूल्यांशी सुसंगत नव्हते. अशा वर्तनाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. – माइल्स बास्कोम्बे, सीडब्ल्यूआयचे संचालक