यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात खेळले जाताहेत वेगवेगळे डावपेच
सोलापूर : कुठे सारखे दिसणारे चिन्ह तर कुठे एकाच नावाच्या अनेक व्यक्ती यासह अनेक भन्नाट डाव यंदाच्या विधानसभा निवडणुकीत टाकले आहे. डाव कोणी टाकले हे जरी सिद्ध होत नसले तरीही कोणासाठी टाकलेत हे सहजपणे लक्षात येते. चिन्ह अन् नाव यातून जिंकण्याची महत्वाकांक्षा दिसून येते. काठावरचा तर विजय मिळावा यासाठी सहा मतदारसंघातील या खेळ्या आता समोर येऊ लागल्या आहेत.
सोलापूर शहर उत्तरमध्ये भाजपकडून विजय सिद्रामप्पा देशमुख मैदानात आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्याकडून महेश कोठे मैदानात आहेत. या शिवाय विजयकुमार उघडे आणि संतोष कोटे हे देखील अपक्ष उमेदवार मैदानात आहेत. नाम साधर्म्याचा काही परिणाम होतो का ? हे येथे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सोलापूर दक्षिणमध्ये भाजपकडून सुभाष देशमुख मैदानात आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अमर पाटील हे मैदानात आहेत. माजी आमदार दिलीप माने यांची माघार आणि सिद्धेश्वर कारखान्याचे प्रमुख धर्मराज काडादी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवली आहे. मतपत्रिकेत काडादी यांचा अ. क्र. १६ असून त्यांचे चिन्ह संगणक आहे. त्यांच्याच खाली अ. क्र. १७ वर परशुराम डोंबाळ हे लॅपटॉप चिन्हावर अपक्ष लढत आहेत.
करमाळ्यात आमदार संजयमामा शिंदे हे पुन्हा अपक्ष निवडणूक लढवत आहेत. बसपाकडून संजय वामन शिंदे तर अपक्ष संजय लिंबराज शिंदे हे पण मैदानात आहेत. संजयमामा शिंदे यांचे चिन्ह सफरचंद असून मतपत्रिकेवरील त्यांचा अ. क्र. १४ आहे. अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांचे चिन्ह शिमला मिरची असून अ. क्र. १५ आहे. २०१४ च्या निवडणुकीत स्वाभिमानी पक्षाकडून संजयमामा शिंदे यांनी निवडणूक लढविली. त्यावेळी त्यांना ५८ हजार ३७७ मते मिळाली. त्यांच्या विरोधात त्यावेळी तीन संजय शिंदे मैदानात होते. संजयमामा शिंदे यांची आमदारकी २२९७ मतांनी हुकली तर तीन अपक्ष संजय शिंदे यांना २८१४ मते मिळाली होती. संजयमामा शिंदे यांचे चिन्ह त्यावेळी शिट्टी होते. अपक्ष उमेदवार संजय महादेव शिंदे यांनी प्रेशर कुकर चिन्हावर दोन हजार मते घेतली होती. त्यावेळी नावात आणि कुकर व शिट्टी या चिन्हातून मतदारांमध्ये संभ्रम झाल्याचे दिसले.