ज्ञानेश्वरी – प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे
पंख न फुटलेल्या पाखराला जरी उडता आले नाही, तरी ते आकाशातच राहते आणि सर्व गगनाचे आक्रमण करणारा गरूडही त्या आकाशात राहतो.’ ही सुंदर ओवी अनुभवावी माउलींच्या मूळ शब्दांत –
‘पांखफुटें पाखिरूं ।
नुडे तरी नभींच थिरु।
गगन आक्रमी सत्वरू।
तो गरुडही तेथ।
ओवी क्र. १७१२
काय बोलावे या अप्रतिम ओवीविषयी! पंख न फुटलेले पाखरू यासाठी ते शब्द योजतात. ‘पांखफुटें पाखिरूं’ यातून किती कोवळीक जाणवते! पंखदेखील न फुटलेले पाखरू कोणाला म्हणतात ज्ञानदेव? स्वतःला. व्यासांना उपमा देतात पक्षिराज गरुडाची. या दोन अवस्था आहेत – एक, आरंभीची आणि एक, परिपक्व असण्याची. पुन्हा त्या दोन वेगवेगळ्या पक्ष्यांच्या संदर्भात आहेत. एक कोणताही पक्षी आहे, तर दुसरा पक्षिराज गरुड आहे. दोन्ही आहेत आकाशात. पण पाखराच्या संदर्भात शब्द येतो ‘नभ’ तर गरुडासंबंधी बोलताना ‘गगन’! या सर्व चित्रातून ज्ञानदेव त्यांच्या अंतरीचा भाव किती सुंदरतेने चितारतात! भगवद्गीतेतील मूळ ज्ञान हे वेदवाङ्मयातील आहे. ते जणू उत्तुंग आकाश आहे. वेदातील सूत्र बांधून गीता लिहिणारे व्यासमुनी हे जणू त्या गगनावर झेपावणारे गरुड आहेत. ही व्यासमुनींची गरुडभरारी.
ज्ञानदेवांनी त्यावर आधारित ‘ज्ञानेश्वरी’ लिहिणे म्हणजे पंखदेखील न फुटलेल्या पाखराने आकाशात राहणे. एवढा अलौकिक ग्रंथ लिहिणारे ज्ञानदेव व्यासमुनींकडे प्रचंड आदराने पाहतात आणि स्वतःला नवोदित मानतात. ही एका संताची विनम्रता आणि कवीची कल्पकता आहे. यापुढेही ज्ञानदेव एकापेक्षा एक साजेसे दृष्टान्त देतात. त्यातील काही आपण पाहूया.
‘राजहंसाच्या सुंदर चालण्याप्रमाणे व्यासमुनींचे गीतालेखन तर आपले लेखन सामान्यांच्या चालण्याप्रमाणे. गीता हे कलशांतील पाणी, तर ज्ञानेश्वरी ही केवळ पाण्याची चूळ होय. ‘आणि बापाच्या मार्गाने लहान मूल जर चालू लागले, तर त्या स्थानाला पोचायचे आहे त्या स्थानाला ते पोहोचू शकणार नाही काय?’ ओवी क्र. १७२१.
अशी दृष्टान्तमाला देऊन ज्ञानदेव पुढे म्हणतात –
‘तसा मी व्यासांचा माग घेत आणि भाष्यकाराला वाटा विचारीत चाललो असता, मी जरी अयोग्य आहे, तरी व्यास ज्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणाला पावणार नाही तर कोठे जाईन?’ ओवी क्र. १७२२
व्यासमुनींविषयी बोलताना तेजाच्या, पराक्रमाच्या विस्ताराने, नात्याने जेवढ्या मोठ्या गोष्टी आहेत, त्यांची उपमा देतात… जसे की, गरूड, राजहंस, बाप इ. स्वतःसंबंधी बोलताना जितक्या लहान गोष्टी आहेत, त्यांची उपमा देतात – पाखरू, सामान्य मूल इ. या सर्वांमुळे ज्ञानदेवांविषयीचा आपला आदर अधिकच दुणावतो. हिमालयाप्रमाणे अफाट प्रज्ञा, प्रतिभा असलेल्या या संतवर्यांनी स्वतःकडे इतका कमीपणा घ्यावा! यातून आपल्याला शिकवण मिळते ‘अहं’ टाकण्याची. माउलींच्या या विलक्षण विनम्रतेमुळे आपणही ‘अहंकार’ मुक्तीची वाट चालायला सुरुवात करू.
करू ना आपण?