ऋतुराज – ऋतुजा केळकर
कुठल्यातरी क्षुद्र मोहात अडकून यशाच्या पाठी ऊर फुटेपर्यंत धावण्यापेक्षा माणसाने आपले जीवन विशुद्ध विचारांनी भरून टाकावे. सारीच सुगंधित, टवटवीत राहिलेली पुष्प ही कधीतरी कोमेजणारच हे जरी विदारक सत्य असले तरी त्यातील सुगंध मनाच्या गाभाऱ्यात अत्तरासारखा घमघमत राहू दे. त्यांचे सौंदर्य आपल्या आयुष्याच्या… रंगपुष्करणी… इंद्रधनुष्यी पैठणीवर मयुरगोंदणी चैतन्याच्या स्वयंप्रेरीत उद्यमशील नक्षीकामाने जीवनाच्या वाटेवर ध्येयपूर्तीच्या दिशेने कुच करावयास भाग पाडू दे. पण बरेचदा नवे पंख फुटूनही किंवा सुविचारांचे धुमारे धुमसत असतांनाही जीवनाची ध्येयपूर्तीच होत नाही ती अंगात ‘पंचगुणांचा अभाव’ असल्यामुळेच. आता आपण म्हणालं की हे ‘पंचगुण’ तरी कोणते…?
तर सर्वप्रथम आपल्या जीवाला एक ‘दिशा’ असणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणजे असे पाहा आजकाल पालक आपल्या मुलांना प्रत्येक गोष्टीत प्रवीण करण्याचा प्रयत्न करतात. मान्य आहे त्याचा फायदा त्यांना त्यांच्या पायावर सज्जडपणे उभे रहाण्यास होतोच होतो. पण जेव्हा एका विशिष्ट क्षणी त्यांना, “आता… यापुढे मी नक्की काय करू? “ हे ठरवण्याची वेळ येते तेव्हा त्यांना नक्की कळतच नाही की, आपण कुठल्या दिशेने जायला पाहिजे. काही काही मुलांना तर सारे काही थोडं थोडं येतंय पण प्राविण्य असे एकातही नाही असे असते. मग अखेरीस आपला कल… आपली आवड… जपण्याऐवजी त्यांना जीवनाच्या निर्मितीच्या त्याक्षणी कुठल्या तरी सबबीमुळे म्हणा किंवा लाचारीच्या तडजोडींमुळे म्हणा किंवा आर्थिक फटी – उणिवा बुजवण्याकरिता म्हणा चुकीची वाट निवडावी लागते अन् मग आयुष्य हरवलेल्या श्रीकृष्णाच्या बासरी सारखे अपयशाच्या सुर्याच्या दाहकतेत जीवनाचे सुमधुर संगीत हरवून बसतं आणि मग सरतेशेवटी आयुष्यभर अखंडपणे अविरत सगळ्यांच्या अपेक्षांच्या मृगतृष्णेत पिचून अखेरीस जेव्हा अंतिम क्षणी संवेदनाहीन होऊन अंथरुणावर लोळागोळा झालेला त्यांचा देह आपल्या अस्तित्वाचा डोलारा हरवून गलितगात्र होऊन पडतो तेव्हा जाणवते की, ‘उदी आणि राख’ यात काय फरक आहे तो. तेव्हा जाणवते की, दिशाहीन झाल्यावर होणारा आयुष्याचा पर्णपाचोळा… जाणवते की आत्म्याची… कर्मयोगाची हाक न ऐकल्याने हरवलेल्या हिरवेपणाची सहिष्णूता… प्रत्येक वळणावर परिस्थिती आणि जबाबदाऱ्या यांच्या हट्टी निग्रही धुक्यात आपले हरवणे… दिशाहीनपणे … म्हणूनच आपल्या आयुष्याची दिशा ठरवताना खुप ‘डोळसपणा’ गरजेचा आहे.
एकदा का दिशा ठरली की, मग त्या पर्यंत पोहचण्याची जिद्द मनात ठासून भरणे गरजेचे आहे. ससा आणि कासवाच्या साध्या गोष्टीतच पहा ना… ससा हिरवगार लुसलुशीत गवत पोटभर खाऊन आणि झऱ्याचे झुळझुळते पाणी पिऊन, गर्द हिरव्या झाडीत गाढ झोपी गेला… पण कासव मात्र … ध्येयासक्तीने… यशाच्या दिशेने हळूहळू सरकतच राहिला म्हणूनच तर कासवालाच यश मिळाले. म्हणजेच परिश्रम आणि आत्मविश्वास अत्यंत गरजेचे आहे. म्हणजेच परिश्रमाने यश मिळवण्यासाठी गरजेचे आहे ते स्वतः तील प्राविण्याबरोबरच आपल्यातील वैगुण्ये तसेच तृटी देखील आपल्याला ज्ञात असणे गरजेचे आहे.
आणि मग असे झाले तर पश्चात्तापाच्या कळवळ्यात नव्या बिज बाहुल्यांची रोवणी ही आपोआपच होते नाही का? कसे आहे ना की, इंद्रायणी असो अगर कोपऱ्यावरील गटारगंगा दोन्हींचीही अखेर ही सागरातच होते फक्त फरक अस्तित्वाचाच नव्हे तर पायसतेचा आहे की जो ज्याचा त्यानेच शोधायचा असतो.