Sunday, October 26, 2025
Happy Diwali

स्वामी नाम साधना

स्वामी नाम साधना

समर्थ कृपा - विलास खानोलकर

श्री कलियुगात दिवसेंदिवस नितिमत्ता, प्रेम, श्रद्धा, कमी होऊन, जीव अस्थिर, गोंधळलेला बनत जाऊन शेवटी माणूस माणसालाच खायला उठतो. अशावेळी जे जीव कर्मकांडात न अडकता, केवळ नामावर अढळ श्रद्धा ठेवून निश्चयाने नियमित नाम घेतील त्यांनाच शांतीचा, आनंदाचा ठेवा गवसेल. आजही काही संत महात्मे भारतभर आहेत. जसजशी उपासना वाढत जावून नाम साठेल तसतसे अद्भुत ईश्वरी शक्तीचे पाठबळ त्या जीवाला निश्चित मिळेल. यासाठी आपणास प्रिय असणाऱ्या देवाचे गुरूचे नाम सातत्याने घेणेच श्रेयस्कर ठरेल. आपण काय करतो. कुणाचे नाम घेतो, किती घेतो याचा उहापोह इतरेजनात करू नये, तसेच उपासनेचा अहंकार होऊ न देता नम्रतेने, शांततेने व अलिप्ततेने वागणे आवश्यक आहे. सिद्धी उपासनेमुळे सहज साध्य होतात पण मग त्या सिद्धिच्या जोरावर घडणाऱ्या घटनांवर जीव अडकून राहतो नि मिळालेली शक्ती वापरून सिद्धी नष्ट होऊन बसते. म्हणून सिद्धी प्राप्त झालेल्याने फारच जपायला हवे. ही शक्ती कुणाचे वाईट करण्यात, चमत्कार करून दाखवण्यात नाहक वाया जावू न देता दुसऱ्याच्या भल्यासाठी वापरून कायम राखली तरच अंतिम समाप्तीच्या वेळी नामाचे गाठोडे पाठीशी घेऊन मुक्तीच्या मंदिराच्या पायऱ्या चढता येतात, अन्यथा, जाणे नि पुन्हा येणे हाच नित्यक्रम पुन्हा चालू होतो.

दररोज एक नित्याची ठरावीक वेळ पक्की करून त्याचवेळीच मोजून ५ वेळा नामजप करावा. त्यासाठी स्नान, स्थळ, आसन, न पाहता असाल तेथे वेळ साधून नित्यक्रम जपावा. नंतर येता जाता वेळ मिळेल तेव्हा न मोजता अखंड नाम घेऊन अनुसंधान साधावे. मानवजन्म नुसती पोटाची खळगी भरण्यापुरताच मर्यादित नाही. तर आपल्याला मिळालेल्या पैशाच्या १/१० भाग दानधर्मात विशेषत्चे अनाथाश्रम, वृद्धाश्रम, अपंग आश्रम, कॅन्सर रुग्णालय येथे अन्नदानात खर्च करावा. गरीब विद्यार्थ्यांना वही, पुस्तके, गणवेश द्यावे.

मुले, प्राणी, वृद्ध, अनाथ यांची निरलसपणे सेवा करून आत्म्याचा आशीर्वाद घ्यावा. आळसात वेळ न दवडता, कर्तव्यकर्म करून उद्योगी राहावे. प्राणीमात्रात ईश्वर शोधावा. स्वामी तेथेच आशीर्वाद देत उभे असतात.

दीपावली स्वागत गीत

आली दिवाळी आली नववर्ष घेऊन आली ||१|| इंद्रधनुष्याचे रंग उधळीत आली स्वागतास रविराज आले खाली ||२|| तेजस्वी सात घोड्यांचा रथ घेऊन आले स्वामींच्या स्वागतास रवीकिरण आले ||३|| “ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे “ म्हणत स्वामी समर्थच रथातून आले ||४|| तेजस्वी स्वामीच जणू पृथ्वीतलावरती सुख वाटण्यास अवतरले ||५|| स्वामी समर्थ माझे आई, धाव पाव घ्यावा आई ||६|| स्वामी समर्थ माझे बाबा आई, ते साईबाबा साई ||७|| स्वामी समर्थ ताई-माई-आई, तेच माझे बहिणाबाई ||८|| अक्कलकोटच माझे माहेर आई, केव्हा भेटण्यास येवू मी आई ||९|| स्वामींचा मठच वाटे मला काशी, गया आणि वाई ||१०|| श्री गुरु साई समर्थ, जय जय स्वामी समर्थ ||११|| दिलात माझ्या जगण्याला अर्थ भक्त सारे निःस्वार्थ ||१२|| गोरगरिबांची सेवा हाच परमार्थ अपंग सेवा हा दुसरा परमार्थ ||१३|| भुकेलेल्या परिपूर्ण अन्नदान तहानलेल्या पाणी दान ||१४|| विद्यार्थ्याला शिक्षा दान शिकवा तुम्ही श्रमदान ||१५|| भरपूर शिकुनी व्हा मोठे गोमातेसाठी बांदा गोठे ||१६|| एकोप्याने समाज करा मोठे पराक्रमाने महाराष्ट्र करा मोठे ||१७|| जग जिंकूनी राष्ट्र करा मोठे दया क्षमा शांती सारे मोठे ||१८|| गुरु आशीर्वाद मोठे बंधू भगिनी आशीर्वाद मोठे ||१९|| मात्यापित्याचे आशीर्वाद मोठे स्वामींचे आशीर्वाद जगात मोठे ||२०||

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा