जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला सरकार सत्तेत आले आहे. कलम ३७० वरून निवडणुकीतच वातावरण तापले होते. या मुद्दावर गेल्या दोन दिवसांपासून मोठा वाद सुरू आहे. आज या धुसफुसीचे रुपांतर धक्काबुक्की आणि हाणामारीपर्यंत गेलं आहे. विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले. कलम ३७० वरून धुमश्चक्री उडाली. हे कलम परत घेण्यासाठी वाद उफाळून आला आहे. दोन्ही गटातील आमदार आज एकमेकांना भिडले.
विधानसभेत तुफान राडा
आज जम्मू आणि काश्मीर विधानसभेत तुफान राडा झाला. आमदारांमध्ये कलम ३७० वर झटापट झाली. यावेळी कलम ३७० रद्द करण्याची मागणी करणारे पोस्टर फाडण्यात आले. विधानसभेचे कामकाज या गोंधळामुळे २० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले होते. मात्र, दोन्ही बाजुचे आमदारांची आक्रमकता पाहता आज विधानसभेच्या कामकाजाला जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे. सकाळी सकाळीच विधानसभेत मोठा हंगामा झाला. त्यानंतर दोन्ही गटाचे आमदार आमने-सामने आल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. घोषणाबाजीने सभागृह चांगलंच दणाणून गेले.
कलम ३७० वरून मोठा गदारोळ
आज सकाळीच आमदार शेख खुर्शीद कलम ३७० पुन्हा बहाल करण्यात यावे अशी मागणी करणारे पोस्टर घेऊन सभागृहात आले. हे पोस्टर पाहताच भाजप आमदार भडकले. त्यावेळी त्यांनी हे पोस्टर हिसकवण्याचा आणि फाडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये दोन्ही गटामध्ये झटापट झाली. भाजप आमदारांनी शेख खुर्शीद यांच्या हातातून पोस्टर हिसकावलेच आणि ते फाडले सुद्धा. एकमेकांची कॉलर पकडून बॅनर हिसकावून घेण्यास दोन्ही बाजूंनी सुरुवात केली. गोंधळ वाढत असल्याचे पाहून मध्यस्थी करणाऱ्या मार्शलनी भाजप आमदारांना सभागृहाच्या बाहेर काढले.