पावसातली ‘निवडणूक’ अन् दिवाळी…!

Share

कोकणात गेले दोन दिवस पाऊस थांबला आहे. दिवाळीच्या कालावधीत एक-दोन वेळा परतीचा पाऊस पडायचा हा पूर्वानुभव अलिकडे खोटा ठरत आहे. अगदी यावर्षी तर कोकणातील भातशेतीचे होणारे नुकसान पाहावं लागत आहे. कोकणातील शेतकरी हतबल आहे. महिन्याभरापूर्वी यावर्षी शेती उत्तम आहे. कदाचित बंपर तांदूळ घरात येईल असं सांगणारा शेतकरी… जे नुकसान झाले आहे ते झालेले नुकसान सोसण्यापलिकडे आपण काही करू शकत नाही. यामुळेच पावसाच्या शेतीत साचलेल्या पाण्यातून काही वाचवता येईल का? हा प्रयत्न शेतकरी करीत राहिला. ते हातात पीक येईल ते आपलं म्हणत कोकणातील शेतकरी शेतामध्ये राबत असतो. त्याच पद्धतीने कोकणातील शेतकऱ्यांने जे त्याच्या हातात पीक आलंय ते घेतलं. दिवाळीत पाऊस पडतच नाही असे नाही; परंतु यावेळी फारच पावसाने कहर केला आहे.

संतोष वायंगणकर

दररोज सकाळ-संध्याकाळ पाऊस कोसळत होता. यामुळे शेतकऱ्यांना भातकापणी आणि भाताची झोडणी अशा सर्वच बाबतीत अक्षरश: कसरत करीत कामे आटोपवावी लागली. एकिकडे हे पावसाळी वातावरण राहिल्याने नोव्हेंबर महिन्यात सुरू होणारी थंडी अद्यापपर्यंत सुरू झालेलीच नाही. दिवाळीचा अभ्यंगस्नानाचा पहिला दिवस हा कडाक्याच्या थंडीचा असायचा. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी प्रचंड पडलेली कडाक्याची थंडी या अशा थंडीच्या वातावरणातील अभ्यंगस्थान आणि तुळशी वृंदावनासमोर निरांजनाच्या किंवा समईच्या मंद ज्योतीच्या साक्षीने कारीट फोडणे, त्यातल्या दोन-चार कारटाच्या बिया तोंडात टाकणे तो कडवटपणा नकोसा होणारा; परंतु कुटुंबातील ज्येष्ठांकडून, आई-वडिलांकडून होणाऱ्या आग्रहाने तो कारटाचा कडवटपणाही गोड मानून गरमा-गरम कांदा-पोहे आणि आई, वहिणी, बहिणींच्या हातचा घरातला लाडू, चिवडा, चकली, चण्याचं पीठ आणि गूळ घालून बनवलेली करंजी असा सकाळच्या प्रहरी नाश्ता करूनच दिवाळी सणाचा शुभारंभ व्हायचा. आजही यात फार बदल घडला असे नाही; परंतु अलिकडे तयार मिळणारा फराळ बाजारात जागो-जागी उपलब्ध असतो; परंतु घरात आई-बहिणींच्या हातच्या फराळाची चव कशाला येऊच शकत नाही.

बदलत्या स्थितीत गावातली दिवाळी आणि शहरांमधली दिवाळी हा मोठा फरक फार पूर्वीपासून आहे. गावातून फटाक्यांची आतषबाजी किंवा विद्युत रोषणाई नसते; परंतु पहाटेच्या अभ्यंगस्नानाला पहिलं कारीट कोणी फोडलं यात मात्र जोरदार स्पर्धा असायची. ‘गोविंदा रे गोपाळा’ अशी गावातल्या वाडीत पहिली आरोळी कोणी ठोकली यावरून स्पर्धा असायची आणि मग पहाटे पहिला कोण उठला यातही सकाळी एक दुसऱ्याकडे फराळ करताना आपल्या कोकणात खूप गजाली व्हायच्या. अलिकडे हे वातावरण राहिले नाही. सर्वसाधारणपणे वातावरणातील बदलाचा परिणाम निश्चितपणे होत आहे. या वर्षीची दिवाळी ही महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या वातावरणातच होत आहे. दिवाळीच्या या पंधरवड्यातच राज्यातील निवडणुका पार पडत आहेत. या निवडणुका दिवाळीत होत असल्याने निवडणूक प्रचार करणाऱ्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांनाही अतिशय आनंदी, उत्साही वातावरणात निवडणूक प्रचारही होताना दिसतो. कोकणात तीन-चार मतदारसंघांत चौरंगी, तिरंगी, पंचरंगी लढत होत आहे. यामुळे साहजिकच निवडणुकीतील वातावरण ढवळून निघत आहे. खरंतर कोणत्याही निवडणुका या विकासाच्या मुद्यावर लढवल्या गेल्या पाहिजेत. आपल्या सत्ता काळात कोणती विकासकामे झाली. समाजहिताचे कोणते निर्णय सरकारने घेतले.

सरकारने घेतलेल्या निर्णयांचा फायदा सर्वसामान्य जनतेला कसा होऊ शकला याची मांडणी झाली पाहिजे; परंतु आपण काय काम केले. जनतेच्या हिताचे कोणते निर्णय घेतले हे ज्यांना सांगता येत नाहीत किंवा सांगण्यासारखं काही नसते ते नेते, पुढारी वैयक्तिक टीका करत राहतात.कोकणातील कोणत्याही निवडणुका असल्या तरीही ‘राणे’ टार्गेट केले जातात. कोणत्याही निवडणुकीत राणे हेच टीकेंच्या केंद्रस्थानी असतात. वैयक्तिक स्वरूपात त्यांच्यावर टीका केली जाते. यामध्ये कोकणातील हे देखील एक सत्य आहे की विरोधकांकडून राणेंवर कितीही टीका झाली तरी निवडणुकीत निवडून मात्र राणेच येतात. यामुळे कोकणातील निवडणुका म्हटल्या की, विकासावरची चर्चा केलेली विकासकामे यावर चर्चाच होताना दिसत नाही. कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यांमध्ये एकिकडे अधून-मधून येणारा पाऊस, शेतात धावपळीत असणारा शेतकरी आणि त्याचवेळी निवडणुकीचे असलेले वातावरण या निवडणुकीचा प्रचार, शेतकऱ्यांच्या, ग्रामस्थांच्या, कार्यकर्त्यांच्या होणाऱ्या गाठीभेटी, होणारा संवाद, वैयक्तिक संवादावरच यावेळच्या निवडणुकीत भर देण्यात आला आहे. यामुळे एकिकडे मध्येच पावसाळी वातावरण, निवडणुकीचे कार्यकर्ते, पुढारी यांची धावपळ आणि दिवाळीतील उत्साही वातावरण अशा या वातावरणात कोकणवासीय शेतीची कामे, दिवाळीच्या फराळाचा आस्वाद आणि निवडणुकीतील टीकाटिपणीचे फटाके याचा आनंद घेत आहेत.

Recent Posts

Star Pravah vs Sony Marathi : स्टार प्रवाह आणि सोनी मराठीमध्ये टक्कर!

'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…

19 minutes ago

Nails : नखे ठरवतात तुम्ही किती वर्ष जगणार; जाणून घ्या कसं?

मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…

20 minutes ago

Dot Ball : IPL चे डॉट बॉल आणि झाडांचं काय आहे कनेक्शन ?

सध्या आयपीएलचा सीझन रंगात आला आहे. संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून क्रिकेटप्रेमी टीव्ही किंवा मोबाईलसमोर ठाण मांडून…

50 minutes ago

वकिलांनो, AI तंत्रज्ञानाशी जुळवून घ्या; एआयच्या मदतीने प्रलंबित खटल्यांमध्ये होऊ शकते घट

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसन यांचे मत मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI)…

50 minutes ago

शिक्षकांसाठी ड्रेसकोड? प्रस्ताव पुन्हा ऐरणीवर!

मुंबई : शिक्षकांसाठी ड्रेसकोड ठरवण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडून पुन्हा एकदा विचाराधीन आहे. प्रत्येक जिल्ह्याला…

1 hour ago

Extradition Meaning : प्रत्यार्पण म्हणजे काय?

काही दिवसांपूर्वी २६/११ चा मुंबई दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा याचं भारतात प्रत्यार्पण झालं. त्यानंतर…

1 hour ago