मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सलमान खानला (Salman Khan) लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे. धमकी देण्याचे प्रकरण चर्चेत असताना आता बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खान (Shahrukh Khan) यालाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या बॉलीवूड क्षेत्रात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फैजान नावाच्या एका व्यक्तीने रायपूरहून शाहरूख खानला धमकीचा फोन केला. या धमकीमध्ये ‘५० लाख रुपये द्या, नाहीतर जीवे मारुन टाकू’ अशी धमकी दिली. धमकी मिळाल्यानंतर मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, शाहरुखने काही दिवसांपूर्वी सलमान खानचीही भेट घेतली होती. तसेच यांचे घर जवळपास असल्यामुळे शाहरुख खानला धमकी देण्यात आली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
याप्रकरणी पोलिसांचे पथक रायपूरला गेले असून पुढील तपास अद्याप सुरू आहे. तसेच पोलिसांनी मन्नतच्या बाहेर बॅरिकेड्स लावले आहेत. तर शाहरुख खानची सुरक्षाही वाढवली जाण्याची शक्यता आहे.