अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव करून ऐतिहासिक विजय प्राप्त केला. ट्रम्प यांना अमेरिकेचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याचा मान मिळाला. अमेरिकन मतदारांचे अफाट समर्थन आणि ज्यो बायडेन व कमला हॅरिस यांच्या विद्यमान सरकारबद्दल असलेली नाराजी निवडणुकीतील मतदानातून प्रकट झाली. ट्रम्प व हॅरिस यांच्यात अटीतटीची लढत होईल, असे राजकीय विश्लेषकांना वाटत होते, प्रत्यक्षात ट्रम्प यांना मतमोजणीत सुरुवातीपासून मिळत राहिलेली आघाडी शेवटपर्यंत कायम टिकली. विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, अमेरिकेला महान बनविण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करीन, आपण अमेरिकेत सुवर्ण युगाची सुरुवात करणार आहोत….ट्रम्प हे अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष असतील. सर्वात शक्तिशाली राष्ट्राच्या सर्वोच्च अशा राष्ट्राध्यक्षपदाच्या खुर्चीवर ट्रम्प यांना दुसऱ्यांदा बसविण्याचा जनादेश अमेरिकेतील मतदारांनी दिला आहे. अमेरिकेच्या मतदारांनी त्यांच्या हाती अमेरिकेची सूत्रे मोठ्या विश्वासाने पुन्हा एकदा सोपवली आहेत. ट्रम्प यांनी आपल्या विजयाचे श्रेय टेस्ला व स्पेस एक्सचे सीइओ इलॉन मस्क यांना उदार मनाने दिले आहे. इलॉन मस्क यांनी मोठ्या कल्पकतेने ट्रम्प यांची बाजू सोशल मीडियातून मतदारांपुढे सातत्याने मांडली. त्याचा मोठा लाभ ट्रम्प यांना झाला. विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ही निवडणूक म्हणजे सर्वात मोठे राजकीय आंदोलन होते. यापूर्वी असे कधी घडले नसावे…
प्रत्येक अमेरिकन नागरिक, त्याचा परिवार व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहीन. अमेरिकन नागरिकांच्या मुलांचा हक्क असलेला हा देश मजबूत, सुरक्षित व समृद्ध निर्माण करेपर्यंत मी आराम करणार नाही. असे विजयानंतर ट्रम्प यांनी जनतेला वचन दिले आहे. माजी राष्ट्राध्यक्षांनी निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पुढील अमेरिकच्या इतिहासात १३३ वर्षांनी पुन्हा घडत आहे. म्हणूनच ट्रम्प यांनी मिळवलेला विजय हा ऐतिहासिक आहे. मतमोजणी चालू असताना व ट्रम्प हे सातत्याने मुसंडी मारत असताना ट्रम्प विजयी झाले व कमला हॅरिस पराभूत झाल्याचे फॉक्स न्यूजने वृत्त दिले. जगातील सर्वात मोठी महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर डोनाल्ड ट्रम्प यांच्या झालेल्या निवडीचे भारतावरच नव्हे जगातील सर्वच देशांवर काही ना काही परिणाम होणार आहेत. जागतिक घडामोडींवर अमेरिका सतत लक्ष ठेऊन असते व अमेरिकेच्या भूमिकेचा जागतिक घटनांवर परिणाम होतो, म्हणून ट्रम्प यांच्या निवडीला आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष महत्त्व आहे. अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष ट्रम्प व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मैत्री जगजाहीर आहे. ट्रम्प यांच्या विजयाने भारताला निश्चतच लाभ अपेक्षित आहे. भारत- अमेरिका संबंधांना ट्रम्प यांच्या निवडीने नवीन दिशा प्राप्त होईल तसेच या दोन देशांतील संबंध दृढ होतील, अशी भारताला आशा आहे. गेल्या निवडणुकीतही मोदींनी अमेरिकेच्या भेटीवर असताना ट्रम्प यांनाच शुभेच्छा दिल्या होत्या.
अमेरिकेत बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांविषयी ट्रम्प अतिशय गंभीर आहेत. बाहेरून येणाऱ्या लोकांवर त्यांनी त्यांच्या पहिल्या कारकिर्दीत निर्बंध लादले होते. इमिग्रेशन धोरण व एच १ बी व्हीसा याबाबत त्यांनी पूर्वीचेच धोरण अवलंबले, तर भारतीयांनाही त्याचा जाच सहन करावा लागेल. अमेरिकेत कुशल कामगार म्हणून जे भारतीय जाऊ इच्छितात, त्यांच्यावर निर्बंध येऊ शकतील. मोदी-ट्रम्प यांच्या मैत्रीमुळे भारतीयांना अमेरिकन व्हिसा मिळवताना त्रास होऊ नये, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. ट्रम्प पहिल्या कारकिर्दीत राष्ट्राध्यक्ष असताना २०१९ मध्ये टेक्सास येथे हाऊडी मोदी या जंगी कार्यक्रमात मोदी-ट्रम्प यांची मैत्री जगाने बघितली होती. नंतर ट्रम्प भारताच्या दौऱ्यावर आले असताना मोदींनी अहमदाबाद येथे त्यांच्यासाठी नमस्ते ट्रम्प हा जंगी कार्यक्रम योजला होता. ट्रम्प यांचे धोरण अमेरिका फर्स्ट असे आहे. त्याचा परिणाम भारतातून तेथे जाणाऱ्या वस्तूंवर होऊ नये,याची दक्षता भारताने घेतली पाहिजे. भारतासह अन्य देशांतून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर ट्रम्प आल्यानंतर मोठे कर लादले जातील अशी भीती व्यक्त केली जात आहे. भारत-चीन संबंध सलोख्याचे नाहीत या मुद्द्यावर अमेरिका-भारत यांच्यात जवळीक होऊ शकते. तसेच अंतर्गत विकास, आर्थिक राष्ट्रवाद व सीमा सुरक्षा या मुद्द्यांवर भारत – अमेरिका यांच्यात देवघेव वाढू शकते. ट्रम्प यांनी नेहमीच दहशतवाद विरोधी भूमिका मांडली आहे, त्यातून पाकिस्तानवर नियंत्रण राहील अशी अपेक्षा आहे. तसेच बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या हल्ल्यांसंबंधी ट्रम्प यांनी चिंता व्यक्त केली होती. बांगलादेश मुद्द्यावर ट्रम्प यांनी भारताचे खुले समर्थन केले होते.
सन २०१९ मध्ये काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी करण्याची ट्रम्प यांनी तयारी दर्शवली होती. मोदींना तसेच हवे आहे, असे अमेरिकेने म्हटले होते. पण भारताने लगेचच अमेरिकेचा दावा फेटाळला होता. आता ट्रम्प यांनी नव्या कारकिर्दीत पुन्हा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला तर भारताला सावध भूमिका घ्यावी लागेल. ट्रम्प हे चार वर्षे सत्तेबाहेर होते. सतत चौकशी व न्यायालयात चकरा चालू होत्या. त्यामुळे जनतेत त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली. तसेच रशिया – युक्रेन युद्धात बायडेन सरकारने घेतलेली लेचीपेची भूमिका लोकांना आवडली नाही. स्वत: बायडेन यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली तेव्हा निवडणुकीला तीनच महिने बाकी होते. महागाई व बेरोजगारी या ज्वलंत मुद्द्यावर डेमॉक्रॅटिक पक्ष बचावात्मक राहिला. उलट ट्रम्प यांच्या अगोदरच्या कारकिर्दीत हे मुद्दे सौम्य होते. गेल्या वेळी ट्रम्प यांनी सत्तेत आल्यावर अमेरिकेतील १ कोटी घुसखोरांना बाहेर हाकलून दिले होते. मेक्सिकोच्या सीमेवर सुरक्षा भिंत उभारली. कोणीही बेकायदा अमेरिकेत येऊ देणार नाही, असा प्रचार ट्रम्प यांनी केला. ट्रम्प यांच्या आक्रमक प्रचारापुढे कमला हॅरिस यांचा प्रचार फिका पडला. अमेरिकेतील समृद्धीवर अमेरिकन लोकांचाच हक्क राहील, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.