३ कोटींहून अधिक प्रवाशांनी केला प्रवास
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडच्या एकत्रित लोकसंख्येइतके लोकांनी ४ नोव्हेंबरला केला रेल्वेतून प्रवास
नवी दिल्ली : सणासुदीच्या निमित्ताने भारतीय रेल्वेने केलेल्या विशेष व्यवस्थेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने रेल्वे प्रवासी रेल्वे स्थानकांवर आले. तेव्हा आपोआपच एक नवा विक्रम रचला गेला. ४ नोव्हेंबरला भारतीय रेल्वेतून ३ कोटींहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. ही संख्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.
४ नोव्हेंबर रोजी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी १९.४३ लाख प्रवाशांनी आरक्षित श्रेणीत प्रवास केला. तर १,०१,२९,००० प्रवाशांनी गैर-उपनगरीय सेवांच्या अनारक्षित श्रेणीत प्रवास केला. तसेच या दिवशी १ कोटी ८० लाख लोकांनी उपनगरीय रेल्वेने प्रवास केला. भारतीय रेल्वेने प्रमुख स्थानकांवर केलेली सर्वव्यापक व्यवस्था आणि विशेष गाड्या चालवल्यामुळे हे यश साध्य करण्यात रेल्वेला मदत झाली आहे. यात उल्लेखनीय बाब ही आहे की, भारतीय रेल्वेने २०२४ मध्ये ७७०० हून अधिक विशेष गाड्या चालवण्याची योजना आखली. गतवर्षी भारतीय रेल्वेने विशेष गाड्यांच्या ४४२९ फेऱ्या चालवल्या होत्या. दरम्यान या वर्षी, भारतीय रेल्वेने तुलनेने ७३ टक्के अधिक विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. ज्यामुळे सणासुदीच्या काळात एक कोटीहून अधिक प्रवाशांना यातून फायदा होईल अशी अपेक्षा आहे. १ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांद्वारे ६५ लाखांहून अधिक प्रवासी त्यांच्या गंतव्यस्थानी सुरक्षित पोहोचले आहेत.
यावर्षी १ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत प्रवासासाठी प्रवासी रेल्वे स्थानकांवर मोठ्या संख्येने आले. त्यांच्या सेवेसाठी प्रत्येक स्थानकावर जमाव क्षेत्र, अतिरिक्त तिकीट व्यवस्था, प्रवाशांना चढ उतार करण्यासाठी विशेष व्यवस्था आणि अशाप्रकारच्या उत्तम प्रवासी सुविधा पुरविण्यात यामुळे रेल्वेला यश आले. या काळात देशभरातील ७.५० कोटींहून अधिक प्रवासी सण साजरे करण्यासाठी बिहार, पूर्व उत्तर प्रदेश आणि झारखंडमधील आपापल्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये रवाना झाले.
यावर्षी आतापर्यंत भारतीय रेल्वेने ४५२१ विशेष गाड्या चालवल्या आहेत, ज्याचा ६५ लाखांहून अधिक प्रवाशांना फायदा झाला आहे. भारतीय रेल्वेकडून ३ नोव्हेंबर २०२४ रोजी २०७ विशेष गाड्या चालवल्या, जो एक मोठा विक्रम आहे. तर दिनांक ४ नोव्हेंबरला २०३ विशेष गाड्या आणि दिनांक ५ नोव्हेंबर रोजी १७१ विशेष गाड्या चालवण्यात आल्या. तर दिनांक ६ नोव्हेंबर रोजी १६४ विशेष गाड्या आणि दिनांक ७ नोव्हेंबर रोजी अतिरिक्त १६४ विशेष गाड्या चालवण्याचे नियोजन केले आहे.
छठच्या सणानंतर बिहार व पूर्व उत्तर प्रदेशमधून इतर शहरांमध्ये परतणाऱ्या लोकांसाठीही भारतीय रेल्वेने विशेष व्यवस्था केली आहे. भारतीय रेल्वेने ८ नोव्हेंबर रोजी १६४ विशेष गाड्या, ९ नोव्हेंबर रोजी १६० विशेष गाड्या, १० नोव्हेंबर रोजी १६१ विशेष गाड्या आणि ११ नोव्हेंबर रोजी १५५ विशेष गाड्या चालवण्याची व्यवस्था केली आहे. याशिवाय समस्तीपूर, सोनपूर आणि दानापूर विभागात रेल्वे गाड्यांचे विशेष रेक तयार ठेवण्यात आले असून, ते आवश्यकतेनुसार वापरले जातील. रेल्वे मंडळाच्या स्तरावर पुन्हा एकदा सर्व तयारीचा आढावा घेण्यात आला असून सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.