Wednesday, December 4, 2024
Homeताज्या घडामोडीपालघरच्या तरुणाला मारण्यासाठी नाशिकमध्ये सुपारी घेतलेल्या लुधियानातील 'सुपारीबाज' तरुणाला पालघरमधून अटक

पालघरच्या तरुणाला मारण्यासाठी नाशिकमध्ये सुपारी घेतलेल्या लुधियानातील ‘सुपारीबाज’ तरुणाला पालघरमधून अटक

पालघर : पालघर येथील राहुल पवार याला मारण्याची नाशिकमधून सुपारी घेणाऱ्या शुभम सिंग (२९, रा. लुधियाना) याला पालघरमध्ये जेरबंद करण्यात आले आहे. नाशिकमधील तुरुंगात असलेल्या दोन आरोपींनी त्याला या हत्येची सुपारी दिली होती, असे स्पष्ट झाले असतानाच तो ‘सुपारीबाज’ असल्याचेही पोलीस चौकशीत उघड झाले आहे.

पालघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत पराड हे आपले सहकारी उपनिरीक्षक अविनाश वळवी, संकेत पगडे, सहायक फौजदार खंडागळे, हवालदार अशोक तायडे, परमेश्वर मुसळे, सागर राऊत, आकाश आराक, खरपडे, राऊत यांच्यासह गस्त घालत असताना पालघर रेल्वे स्थानकाजवळ एक संशयित व्यक्ती फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली. यावेळी पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक पिस्तूल, सात जिवंत काडतुसे, अशी एकूण एक लाख ६६ हजार किमतीची घातक शस्त्रे सापडली.

त्याचे नाव शुभम सिंग असे असून तो लुधियानातील व्यक्ती असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. यावेळी नाशिक तुरुंगामध्ये खून आणि दरोड्याच्या प्रकरणातील आरोपी परमिंदर ऊर्फ गौरव राजेंद्र सिंग आणि सातपूर पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल असलेला आरोपी आशिष राजेंद्र जाधव या दोघांनी राहुल पवार याला ठार मारण्याची सुपारी त्याला दिल्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली.

शुभम याने अनेक दिवस राहुल पवार यांच्या घराजवळ रेकी करून त्याला ठार मारण्याचे प्रयत्न केले, मात्र ते यशस्वी होत नसल्याने त्याने कंटाळून बोईसर येथील आपल्या नातेवाइकांशी संपर्क साधत त्यांच्या घरी येत असल्याचे कळवले. तो पालघर रेल्वे स्थानकाजवळ आला असताना पालघर पोलिसांनी त्याला रिव्हॉल्व्हरसह अटक केली. यावेळी त्याला नेण्यासाठी बोईसर येथून आलेला रिक्षाचालक आणि अन्य एका व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -