मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले.अर्ज मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबर पर्यंत मुदत होती.त्यामधील काही बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.तर काही बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाही.
यावेळी महायुतीच्या तीनही पक्षांमध्ये सर्वाधिक बंडखोरी दिसून आली आहे. त्यातही भाजपमध्ये बंडखोरांची संख्या अधिक आहे. त्यामुळे बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करण्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दोन दिवसांपूर्वी केली होती. त्यानुसार आता राज्याच्या ३७ विधानसभा मतदारसंघातील ४० बंडखोरांवर कारवाई करण्यात आली आहे.
पक्षाचा आदेश डावलून शिस्तभंग केल्याबद्दल या नेत्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. यामध्ये सावंतवाडीतील विशाल परब, श्रीगोंदामधील सुवर्णा पाचपुते, अक्कलकोटमधील सुनील बंडगर, अमरावती येथील जगदीश गुप्ता, साकोलीतील सोमदत्त करंजकर, सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शोभा बनशेट्टी यांच्यासह एकूण ४० जणांवर कारवाई करण्यात आली आहे.