मुंबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तानात होणार आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळवली जाईल. आता आयसीसी अधिकाऱ्यांची एक टीम १०-१२ नोव्हेंबरपर्यंत पाकिस्तानात स्पर्धेच्या तयारीचा आढवा घेणार आहेत. एका पाकिस्तानी मिडिया चॅनेलनुसार चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक स्पर्धेत भाग घेणाऱ्या देशांना पाठवण्यात आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार ११ नोव्हेंबरला चॅम्पियन्स ट्रॉफीसंबंधित कार्यक्रम होणार आहे. यात क्रिकेटर्ससह अनेक मोठे अधिकाऱ्यांचे सामील होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकावर शिक्कामोर्तब होऊ शकते. याआधी सप्टेंबर महिन्यात आयसीसीच्या काही अधिकारी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तानात पोहोचले होते. एकीकडे पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यासाठी कंबर कसत आहे मात्र भारत पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायला जाणार की नाही याबाबत त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.
पाकिस्तानद्वारे आयसीसीच्या पाठवण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारी ते ९ मार्चपर्यंत खेळवली जाईल. १० मार्चला रिझर्व्ह डे म्हणून ठेवण्यात आला आहे. स्पर्धेचे सामने कराची, रावळपिंडी आणि लाहोरमध्ये खेळवले जातील. फायनलसह ७ सामने लाहोरमध्ये खेळवले जातील तर कराचीमध्ये दोन ग्रुपचे पहिले सामने आणि पहिला सेमीफायनल सामना खेळवला जाईल. दुसरीकडे रावळपिंडीच्या मैदानात दुसऱ्या सेमीफायनलसह ५ सामने खेळवले जातील.
वेळापत्रकानुसार भारतीय संघाचे सर्व सामने लाहोरमध्ये खेळवले जाणार आहे. टीम इंडियाला पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेशसोबत ग्रुप एमध्ये ठेवण्यात आले आहे. भारताचा पहिला सामना २० फेब्रुवारीला बांग्लादेश, न्यूझीलंडसोबत २३ फेब्रुवारीला आणि ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाचा शेवटचा सामना १ मार्चला पाकिस्तानविरुद्ध रंगणार आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाला पाकिस्तानला पाठवण्याचा निर्णय भारत सरकारला घ्यायचा आहे.