योगी आदित्यनाथांचा विरोधकांवर घणाघात
वाशिम : राज्यात सध्या निवडणुका (Maharashtra Election) सुरू असून यामध्ये मोदींच्या नेतृत्वात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती लढत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या रूपाने महाअनाडी निवडणूक लढवत आहेत. ज्यांना देश आणि धर्माची चिंता नाही. ज्यांना राष्ट्रीयत्वाची चिंता नाही, ज्यांना समाजामध्ये मूल्य आदर्शाच्या मर्यादेची चिंता नाही, असे हे महाअनाडी गठबंधन आहे, असा हल्लाबोल योगींनी केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाजपचे उमेदवार श्याम खोडे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेतून महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली आहे. ‘ही महाआघाडी नव्हे तर महाअनाडी आहे,’ असे आदित्यनाथ यांनी म्हटले. यासोबतच आदित्यनाथांनी ‘बटेंगे तो कटेंगेची प्रेरणा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळाली’ असल्याचे मोठे विधान केले आहे.
शिवाजी महाराजांचा संघर्ष असो की संभाजी महाराजांचा संघर्ष आपल्याला नवी प्रेरणा देतो. शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्यांना एकत्र आणलं होतं. प्रत्येक भारतवासीयाला आपल्या सेनेचा हिस्सा बनवलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी एकतेचं प्रदर्शन करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. त्यावरूनच प्रेरणा घेऊन मी वारंवार सांगतो. ‘बटिये मत. क्युकी जब भी बटे थे तब कटे थे, एक है तो नेक है, एक है तो सेफ है, हमे बटना नही है, एकजुट होना है, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वाशिमच्या सभेमध्ये बोलताना औरंगाबादचे नामकरण संभाजीनगरच व्हायला पाहिजे हे सांगत असताना अफजल खान आणि औरंगजेब यांच्यात गफलत केल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या अफजलखानाला मारलं होतं त्याच्या नावावरून औरंगाबाद नाव असणं हे हटवायलाच पाहिजे, संभाजीनगरच्या रूपाने त्याला ओळख मिळाली पाहिजे. शिवाजी महाराजांचा संघर्ष असो की संभाजी महाराजांचा आम्हाला प्रेरणा आणि आदर्श देतो, असे वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेचा नारळ वाशिममधून फोडला. मात्र या सभेला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर कारंजा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार सई डहाके आणि रिसोड विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना (शिंदे) पक्षाच्या उमेदवार भावना गवळी या सभेला अनुपस्थित होत्या. त्यामुळे या तिघांना आमंत्रणच नव्हते की अशा चर्चांना उधाण आले आहे.