मुंबई: येत्या १४ दिवसांत राज्यात एकाच टप्प्यात २८८ मतदारसंघामध्ये निवडणूक पार पडणार आहे. पण आता यासोबतच चर्चा सुरू आहे ती मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याची. कोणत्याही पक्षाने अद्यापही आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. पण महायुतीत मात्र एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे म्हटले जात आहे. पण याच मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी केलेल्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या तर आहेत, पण जर का महायुती विजयी झाली तर कोणाच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडेल, याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी मंगळवारी (ता. ०५ नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत तावडेंना मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी म्हटले की, भारतीय जनता पक्षात ज्या नावांची चर्चा असते ते मुख्यमंत्री होत नाहीत. माझ्या नावाची चर्चा झाली तर मग मी मुख्यमंत्री होणार नाही हे नक्की. त्यामुळे हे पक्के लक्षात ठेवा. काही काळजी करू नका. तुम्हाला राजस्थानचे भजनलाल शर्मा माहिती होते?, मोहन यादव माहिती होते? ओडीशाचे माहिती होते का? त्यामुळे माझ्या नावाची चर्चा झाली ना? याचा अर्थ मी नक्की होणार नाही हे ठरवा. बाकी बघू. पण विधानसभेच्या निवडणुकीत महायुती जिंकेल आणि महायुतीचा मुख्यमंत्री होईल, असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला.