छगन भुजबळ असे का म्हणाले
नाशिक : महायुती सरकारने (Mahayuti) यंदाच्या पावसाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजना (Ladaki Bahin Yojana) महिलांकरीता अंमलात आणली. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातत. या योजनेवरून विरोधक सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. ही योजना निवडणुकीपुरती असून निवडणुकीनंतर ही योजना महायुती सरकार बंद करेल, असे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. यावर आता मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाष्य केले आहे.
छगन भुजबळ यांची आज येवल्यात सभा झाली. या सभेत बोलतांना ते म्हणाले, महायुती सरकारने अनेक जनहिताचे निर्णय घेतले. महिलांसाठी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतले. वडिलांच्या नावासोबत आईचे नाव लावावे, हा निर्णय देखील महायुतीचा आहे, असे भुजबळ म्हणाले.
पुढे ते म्हणाले, हिंदु धर्मात विद्येची देवता सरस्वती आहे. पण मुलींना शिकवले जात नाही. शौर्याची देवता आईभवानी आहे, पण महिलांना बाहेर पडू दिले जात नाही. संपत्तीची देवता लक्ष्मी देवी आहे, पण घरातल्या लक्ष्मीच्या हातात साधे दहा रुपये देखील दिले जात नाही. मात्र, महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. आजवर २ कोटी ७० लाख भगिंनींना पैसे दिले. एवढचं नाही तर कालच मुख्यमंत्र्यांनी, या योजनेत आणखी वाढ करू, असे सांगितले आहे.
मात्र, आमचे विरोधक म्हणतात महायुती सरकार सत्तेवर आले तर योजना बंद करणार. आम्ही ही योजना चालू केली. त्यात १५०० चे २१०० करणार आहोत. योजना बंद करण्याचा प्रश्नच येत नाही. आणि समजा आता जर ही योजना बंद केली तर २ कोटी ७० लाख महिला लाटणं हातात घेऊन बाहेर पडल्या तर आमचा एकतरी माणूस बाहेर पडेल का, असा सवाल भुजबळांनी केला आणि एकच हास्यकल्लोळ झाला.