राज्यात काल उमेदवारी माघारी घेण्याची मुदत संपली तेव्हा तब्बल चार हजारांहून अधिक उमेदवार रिंगणात असल्याचे दिसले. अनेक ठिकाणी बंडोबांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे. बंडोबांना आमदारकीचा गुलाल लागतो की, मतविभाजनामुळे तिसऱ्याच कुणा उमेदवाराला लॉटरी लागते याची उत्सुकता आता आहे. राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक झाला आहे. त्यामुळे कित्येक उमेदवारांना घाम फुटला आहे. त्यातून अनेकांची पराभवाची धाकधूक वाढली आहे. प्रमुख पक्षाच्या उमेदवारांविरोधात अनेक ठिकाणी बंडखोरांनी आपले अर्ज कायम ठेवत निवडणुकीत आव्हान कायम ठेवले आहे. काही ठिकाणी भाजपा विरोधात अजित पवार गटात सामना होणार आहे, तर काही ठिकाणी मविआच्या शरद पवार गटातही लढत कायम आहे. त्यामुळे येथील निवडणूक चुरशीची होणार आहे. कोकणातही बंडखोरी कायम आहे. त्यामुळे अनेक चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत.
मनोज जरांगे-पाटील यांनी माघार घेतली आणि त्यामुळे भाजपाला त्याचा तोटा होणार की फायदा याचीही गणिते आतापासूनच आखली जाऊ लागली आहेत. विशेष म्हणजे मराठवाड्यात भाजपाला म्हणजे महायुतीला विजयी होण्यासाठी दहा टक्के मते वाढवावी लागतील, अशी स्थिती आहे, तर तिकडे कोल्हापुरात पूर्वाश्रमीच्या मधुरिमाराजे छत्रपती यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातो. मधुरिमाराजे या काँग्रेस नेते छत्रपती राजे यांच्या सून असून त्यांनी नुकतीच लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचा पराभव करून निवडणूक जिंकली होती. काँग्रेसला हा धक्का आहे आणि असे अनेक धक्के बंडखोरांनी दिले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही पक्षांना किंवा आघाड्यांना बंडखोरीने ग्रासले आहे. सदा सरवणकर यांनी माघार घेतलेली नाही. त्यामुळे त्यांचे नाव उमेदवार यादीत कायम आहे. त्यामुळे निवडणूक रंगतदार होणार असली तरीही उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी मधुरिमाराजे यांना पाठिंबा दिला होता आणि त्यांनी मधुरिमाराजे यांच्या माघारीनंतर वैताग व्यक्त केला. अन्यत्रही हीच स्थिती आहे आणि जेथे उमेदवार प्रबळ आहेत तेथे त्यांना बंडखोरांचे तगडे आव्हान आहे. महाराष्ट्रात सर्वत्र हीच परिस्थिती आहे.
काँग्रेसला आता अपक्ष लाटकर यांना पाठिंबा देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र बंडखोरीची लागण झाली आहे आणि त्यातून कुणीही सुटलेले नाही. कालपर्यंत बंडखोरांची समजूत घालण्यात व्यस्त असलेले अनेक पक्षांचे ज्येष्ठ नेते शेवटपर्यंत वाटाघाटींत निमग्न होते. पण उपयोग काहीही झाला नाही. भाजपासाठी मात्र काहीसा दिलासा आहे. कारण त्यांचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन भाजपाच्या उमेदवाराची विजयाची वाट मोकळी करून दिली आहे. त्यामुळे भाजपाला बंडोबांना थंड करण्यात यश आले आहे. त्यामुळे भाजपा नेत्यांना झालेला आनंद दिसून येणारा होता. गोपाळ शेट्टी यांची जागा अत्यंत सुरक्षित म्हणून ओळखली जाते. आता तेथे त्यांचे आव्हान नसल्याने भाजपाच्या उमेदवाराचा विजय सोपा असेल. भाजपाचे गोपाल शेट्टी, स्वीकृती शर्मा, विश्वजीत गायकवाड, दिलीप कुमार आदींनी आपापल्या बंडाच्या तलवारी म्यान केल्या आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने लक्षणीय माघार ही मुख्तार शेख यांची आहे. तसेच मधू चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन भाजपाचा विजय सोपा केला आहे, तर पेण, पनवेल आणि अलिबाग येथे शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांना पाठिंबा देण्यास स्वतः उद्धव ठाकरे यांनी सांगितले आणि नंतरच या उमेदवारांनी माघार घेतली आहे. ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी बंडखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर बंडखोरांनी तलवारी म्यान केल्या. पण काही ठिकाणी नेत्यांनी लक्ष घातले नाही. त्यामुळे बंडखोराचे आव्हान कायम आहे. मनोज जरांगे-पाटील यांची भूमिका ही स्वागतार्ह असली आणि ती भाजपासाठी अडचणीची ठरणारी असली तरीही शरद पवार म्हणतात तसे होईल असे नाही. कारण केवळ एका जातीच्या आधारे निवडणूक जिंकून येणे अशक्य आहे हे मनोज जरांगे यांना कळले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही बंडखोर उमेदवारांना माघार घेण्याचे आव्हान केले होते आणि त्यानुसार त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली.
अनेक ठिकाणी अशा तुरळक लढती असल्या तरीही मोठ्या ठिकाणी तरी सहसा नेहमीच्या लढती कायम असतील. निकालात फारसे आश्चर्यकारक बदल नसतील. भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि अजित पवार गट आणि महाविकास आघाडी यांच्यातच सरळ लढती होतील अशी शक्यता दिसते. आता सारे लक्ष लढतींकडे लागले आहे आणि प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी कोण किती देतो आणि प्रत्यक्षात कोणत्या गटाचे कार्यकर्ते किती लोकांना मतदान केंद्रांपर्यंत आणतात यावर मतदानाची आकडेवारी अवलंबून आहे. इथून पुढे कार्यकर्त्यांची धाकधूक असेल ती मतदानापर्यंत ते कसे आणले जातात त्यावर आणि त्यांची कामगिरी काय असते यावर. त्यामुळे काही दिवस फक्त निकालाची वाट पाहणे यातच सारे लक्ष असेल. हरियाणा निवडणुकीचा परिणाम महाराष्ट्राच्या निवडणुकीवर होईल काय असा प्रश्न आहे. भाजपाने तेथे जोरदार मुसंडी मारली आणि अखेरच्या क्षणी निवडणूक जिंकली होती. तीच पुनरावृती पुन्हा भाजपा महाराष्ट्रात करण्याच्या तयारीत आहे. लाडक्या बहिणी भाजपच्या मदतीला आहेत आणि त्या योजनेच्या यशावर भाजपाचे यश निश्चित आहे असे मानले जाते. पण खरे काय ते निकाल लागल्यावरच समजेल. बंडखोरी सर्वत्रच झाली असली तरीही काही ठिकाणी ती शमली आहे. शरद पवार गटाने बंडखोरांना इशारा दिल्यावर काही ठिकाणी बंडखोरी शमली, तर काही ठिकाणी बंडखोरांनी आपण होऊनच माघार घेतली. त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची होणार आहे आणि त्यात कमालीची रंगत असेल हे नक्की. सदा सरवणकर यांच्या उमेदवारीमुळे अमित ठाकरे यांचा मार्ग खडतर झाला आहे.