डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. जागतिक महासत्ता अमेरिकेच्या चाव्या आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातात गेल्या आहेत. भारताबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ते खूप चांगले मित्र आहेत. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केलं आहे.
“निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांचे मनापासून अभिनंदन. तुम्ही तुमच्या मागील कार्यकाळात चांगली कामगिरी केलीत. भारत-अमेरिका व्यापक जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी मी उत्सुक आहे. आपल्या लोकांच्या भल्यासाठी आणि जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्रितपणे काम करूया”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक राज्यांमध्ये मुसंडी मारली आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांची समीकरणे बिघडवली. पेनसिल्वेनिया, जॉर्जिया ही महत्त्वाची मोक्याची राज्ये (स्विंग स्टेट्स) रिपब्लिकन पक्षाने डेमोक्रॅट्सकडून खेचून आणली. नॉर्थ कॅरोलिना या आणखी एका निर्णायक राज्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवला.
अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याचा केला उल्लेख
“आपला देश आता आपण कधीच नव्हता इतका उत्तम बनवणार आहोत. हे यश आपल्या सगळ्यांना एकत्र आणणार आहे. आपल्याला सर्व समस्या सोडवायच्या आहेत. आपण सगळे मिळून अमेरिकेला पुन्हा महान बनवू शकतो. त्यामुळे मला हे संगण्यात अतिशय आनंद होतोय की हे करणं ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. मी तुमचा अपेक्षाभंग करणार नाही. अमेरिकेचं भविष्य आणखी विशाल, आणखी चांगलं, आणखी श्रीमंत आणि आणखी सामर्थशाली असेल. देव तुम्हा सर्वांवर कृपा करो”, असं डोनाल्ड ट्रम्प आपल्या विजयी भाषणात म्हणाले.