Friday, December 13, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यआपल्या भूमीवर भारताचा लाजिरवाणा पराभव!

आपल्या भूमीवर भारताचा लाजिरवाणा पराभव!

भारत – न्यूझीलंड यांच्यात खेळवल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या क्रिकेट कसोटी मालिकेत भारताला ३-० असा लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. शरमेची बाब म्हणजे तिसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात भारताने आघाडी घेऊनही भारताला पराभव पत्करावा लागला आहे.ज्या संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासारखे जागतिक दर्जाचे महान फलंदाज आहेत, त्या भारतीय संघाला शेवटच्या डावात विजयासाठी आवश्यक असणाऱ्या १४७ धावा काढता येऊ नयेत ही अतिशय शरमेची बाब म्हणावी लागेल.

अभय गोखले

भारताच्या सुदैवाने पहिल्या दोन कसोटींत खोऱ्याने विकेट काढणारा न्यूझीलंडचा स्पिनर सँटनर हा तिसऱ्या कसोटीत खेळला नाही, तरी सुद्धा भारताला त्याचा फायदा उठवता आला नाही. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली हे सातत्याने अपयशी ठरत आहेत.रोहित शर्मा हा गेल्या काही सामन्यांत लवकर बाद होत असल्याने, भारतीय संघाला चांगली सलामी मिळत नाही.त्यामुळे आघाडीच्या फळीवर आणि मधल्या फळीवर दबाव येतो. विराट कोहलीच्या अपयशाची मालिका गेले काही दिवस सुरूच आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या संघातील समावेशाबाबत आता गंभीरपणे (गौतम) विचार करण्याची वेळ आली आहे. त्यांच्या या अगोदरच्या कामगिरीचे भांडवल त्यांना किती दिवस पुरणार हा प्रश्न आहेच. वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा यांनी विकेट पण घ्यायच्या आणि धावाही काढायच्या हे फार काळ चालणार नाही. फलंदाजांनी आपली जबाबदारी पार पाडलीच पाहिजे. न्यूझीलंडच्या स्पिनर्स विरोधात भारतीय फलंदाजांनी स्वीकारलेली शरणागती हा नक्कीच चिंतेचा विषय आहे.

न्यूझीलंडने भारताला ३-० असे पराभूत करून बरेच विक्रम नोंदवले आहेत. न्यूझीलंडने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच भारतीय भूमीवर भारताला कसोटी मालिकेत हरविले आहे. १९३३ मध्ये भारताने कसोटी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यानंतर ९१ वर्षांत प्रथमच एखाद्या विदेशी संघाने भारताला, भारतीय भूमीवर कसोटी मालिकेत ३-० अशा मोठ्या फरकाने व्हाईट वॉश दिला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अगोदर २००० साली दक्षिण आफ्रिकेने भारताला, भारतीय भूमीवर २-० असे हरवले होते.अर्थात त्यानंतर २४ वर्षांनी न्यूझीलंडकडून भारताचा ३-० असा झालेला पराभव जास्त बोचणारा आहे. २०१२ साली इंग्लंडने भारताला भारतीय भूमीवर २-१ असे हरवले होते, पण तो व्हाईट वॉश नव्हता. भारताचा न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-० असा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर, भारतीय संघाच्या कर्णधाराची त्यावरील प्रतिक्रिया संतापजनक आहे. तो म्हणाला की, या पराभवावर ओव्हर रिॲक्ट होण्याची गरज नाही. इतका दारुण पराभव झाल्यानंतरही भारतीय कर्णधाराची ही भावना असेल तर भारतीय क्रिकेटचे काही खरे नाही. कर्णधार स्वतः मालिकेत चांगली कामगिरी करू शकलेला नाही, ही गोष्ट या ठिकाणी प्रकर्षाने नमूद करावी लागेल.

न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत पहिल्या सामन्यापासून भारताची अधोगती पाहायला मिळाली होती. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधाराने टॉस जिंकला पण पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा चुकीचा निर्णय घेतला. त्याची फार मोठी किंमत भारताला मोजावी लागली. भारताचा अवघ्या ४६ धावांत खुर्दा उडाला. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासारखे जागतिक कीर्तीचे फलंदाज भारतीय संघात असूनही भारताला नामुष्की पत्करावी लागली. भारताचा विकेटकिपर रिषभ पंत याचा भारतीय संघाच्या सर्वबाद ४६ धावांमध्ये २० धावांचा वाटा होता, ही गोष्ट या ठिकाणी ठळकपणे नमूद करावी लागेल. त्या डावात पंत आणि जयस्वाल हे दोघेच १० चा आकडा पार करू शकले, यावरून इतर फलंदाजांच्या हाराकिरीची पुरेशी कल्पना येते. १९७४ साली इंग्लंड विरुद्ध भारताचा ४२ धावांत खुर्दा उडाला होता. त्या डावात एकनाथ सोलकरने सर्वाधिक १८ धावा काढल्या होत्या, ही आठवण त्यानिमित्ताने जागी झाली. रिषभ पंत आणि जयस्वालची फलंदाजीतील कामगिरी आणि वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, अश्विन यांची गोलंदाजीतील नेत्रदीपक कामगिरी या ठळक गोष्टी सोडल्या तर भारत – न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेबाबत लक्षात ठेवण्यासारखे असे काहीही नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -