मुंबई: २०२३ मध्ये गणपतीच्या दिवसांत ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं होतं.या गाण्यावर बालकलाकार साईराज केंद्रेने बनवलेला व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला होता. साईराजचे गोंडस व निरागस हावभाव पाहून सगळेच थक्क झाले होते. सोशल मीडियावर सर्वत्र साईराजची चर्चा चालू होती. अशातच ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत एप्रिल महिन्यात साईराजची एन्ट्री झाली.
नुकताच दिवाळीच्या सुट्टीनिमित्त साईराज ( Sairaj Kendre ) आपल्या मूळ घरी परतला होता. मात्र, आता शूटिंगच्या सेटवर तो पुन्हा एकदा येण्यासाठी सज्ज झाला आहे. आपल्या वडिलांबरोबर घरातून निघताना साईराज आपल्या आईला मिठी मारून रडल्याचं पाहायला मिळालं. त्याच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. “दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आणि आईला सोडून राहण्याचा पहिला प्रवास सुरू झाला” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.
नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाइक्स अन् कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. आई आणि लेकाचं प्रेम पाहून प्रत्येकाचं मन भरून आलं आहे.