मुरुड: मुरुड आगरदांडा येथील जंगल जेटीवर आज सकाळी आठच्या फेरीबोटीला जाण्यासाठी आलेल्या पाणी बॉटल वाहतूक करणारा पिकअप टेम्पो तीव्र उतारामुळे चालकाच्या नियंत्रणात न राहिल्याने फेरी बोटीवर चढण्याआधीच जेटी वरून समुद्रात कोसळला.
या अपघाताच्या वेळी चालक टेम्पो कोसळल्यानंतर सुखरूप बाहेर आला. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. समुद्राचे पाणी पोटात गेल्यामुळे चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो सुखरूप असल्याचे समजते.
शासनाने श्रीवर्धन तालुका व मुरुड तालुका जोडण्यासाठी आगरदांडा ते दिघी अशी फेरीबोट व्यवस्था सुरू केली आहे. यासाठी आगरदांडा येथे बांधण्यात आलेल्या जेटीला तीव्र उतार असल्यामुळे मालवाहतूक करणारे लोडिंग वाहने चालकाच्या नियंत्रणात राहत नाहीत. त्यामुळे हा अपघात झाला असल्याची चर्चा स्थानिक व इतर वाहन चालकांकडून होत आहे.
या जेटीमुळे दुचाकी व इतर चार चाकी वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागते. त्यामुळे शासनाने ही लाखो रुपये खर्चून बांधलेली जेटी निष्फळ ठरली आहे.