मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीश आणि मुंबईतील विशेष एनआयए न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. दिवाळीच्या सुट्टीत सत्र न्यायालयाच्या रजिस्ट्रार कार्यालयात धमकीचा फोन आला होता. या प्रकरणी कुलाबा पोलिस आणि एनआयए तपास करत आहे. मात्र ही धमकी कोणी दिली हे अद्याप समजू शकले नाही.
१६ वर्षापूर्वी २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमध्ये मोटारसायकलमध्ये ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाला. या घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला होता. १०० हून अधिक जखमी झाले. या प्रकरणाची सुनावणी अजुनही सुरू होती. याच प्रकरणात भाजप नेत्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि इतर पाच जणांवर स्फोटाच्या कटात सहभाग असल्याच्या आरोपाखाली खटला सुरू आहे. या प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे.
या प्रकरणाचा तपास सुरुवातीला महाराष्ट्राच्या एटीएस म्हणजेच दहशतवादविरोधी पथकाने सुरू केला होता. नंतर २०११ मध्ये हा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात माजी एटीएस तपास अधिकाऱ्यानी तपासात अनियमितता केल्याचा आरोप केला होता. तसेच साक्षीदाराला धमकवण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी याच प्रकरणातील आरोपी समीर कुलकर्णीने यांनी गेल्यावर्षी मुंबईतील विशेष कोर्टासमोर लेखी अर्जाद्वारे केली होती.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सुनावणीमध्ये आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी या मालेगाव स्फोटामागे सरकारने बंदी घातलेल्या सिमी संघटनेचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.