अमरावती: दिवाळी आटोपल्याने गृहनगरातून कामासाठी मुंबई, पुणे, नागपूर, अहमदाबाद या महानगरात परत जाण्यासाठी प्रवाशांची रेल्वेत चांगलीच गर्दी होत आहे. त्या अनुषंगाने मध्य रेल्वेद्वारे दररोज विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले. याअंतर्गतच लोकमान्य टिळक टर्मिनस-संत्रागाच्छी सुपर फास्ट विशेष रेल्वेसह पुणे-नागपूर विशेष गाडीची सोय करण्यात आली आहे. ज्यांना मुंबई व पुण्याहून बडनेरा, अमरावती येथे परतायचे अशा प्रवाशांसाठी ही विशेष सुविधा आहे.
३० ऑक्टोबरपासून मध्य रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी दररोज विशेष रेल्वे गाड्या चालवत आहे. नियमित गाड्यांव्यतिरिक्त या गाड्या आहेत. त्यामुळे या गाड्यांमुळे प्रवाशांना प्रवासाचे अतिरिक्त पर्याय मिळाले आहेत. १० नोव्हेंबरपर्यंत या विशेष गाड्या चालणार आहेत. त्यानंतर नियमित गाड्या आहेतच. जरी मध्य रेल्वेने अतिरिक्त विशेष गाड्या दिल्या तरी रेल्वेत प्रवाशांची गर्दी मात्र कायम आहे.