राळेगाव : लाडकी बहीण योजनेत अनेकांना पैसे मिळाले, काहींना नाही मिळाले. माझं सरकार आल्यानंतर मी फुकट गोष्टी देणार नाही. उलट माता भगिनींच्या हातांना मी काम देईन असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. सगळ्या बाजूंनी सत्यानाश होतो आहे. तुम्ही नीट पाहिलं पाहिजे, लोकांना समजावलं पाहिजे. आपण खड्ड्यात चाललो आहे असंही राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडणारा मनसे हा पहिला पक्ष आहे असं राज म्हटलं आहे. तसंच शरद पवारांना संत म्हणत टोला लगावला आहे. यवतमाळच्या राळेगाव या ठिकाणी राज ठाकरेंनी सभा घेतली. त्यावेळी राज ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेवरुनही टीका केली आणि शरद पवारांना जातीपातींमध्ये द्वेष पसरवणारे संत म्हणत त्यांच्यावरही टीका केली.
आपल्याला सध्या जातीपातींमध्ये गुंतवलं जातं आहे. प्रत्येकाची ओळख जातींमध्ये होते. याआधीही जाती होत्या. मला आत्ता माहीत नाही की माझ्याबरोबर बसलेले सहकारी कोणत्या जातीचे आहेत. मला त्याच्याशी काही घेणंदेणं नाही. स्वतःच्या जातीबद्दल प्रेम असणं स्वाभाविक आहे. मात्र गेल्या दहा ते पंधरा वर्षांत स्वतःच्या जातीबद्दल प्रेमापेक्षा दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष पसरवला गेला असा महाराष्ट्र नव्हता. छत्रपती शिवराय, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर कुणीही आम्हाला जातीपातींचा द्वेष शिकवला नाही. ना आमच्या साधू संतांनी जातींचा द्वेष शिकवला. पण आमच्याकडे एक संत जन्माला आले त्यांचं नाव शरदचंद्र पवार. त्या संताने हे सगळं विष पेरलं. हा महाराष्ट्र हिंदुत्वाने भारावला होता. तो महाराष्ट्र जातीपातींमध्ये तोडण्याचं काम शरद पवार यांनी केलं. हाताला काहीही लागणार नाही, या घाणेरड्या गोष्टींमुळे. या सगळ्याच्या जातीपातींपलिकडे माझा तरुण मोठा झाला पाहिजे तरुणी मोठ्या झाल्या पाहिजेत. असं राज ठाकरे म्हणाले.
मी आज तुम्हाला फक्त जागं करायला आलो आहे. महाराष्ट्राचं मतदान पाच वर्षांनी होणार आहे. शाहरुख खान आणि सलमान खानचा सिनेमा नाही. शुक्रवारी पडला तर सोमवारी दुसरा लागला. त्यामुळे मतदान प्रक्रियेकडे तुम्ही गांभीर्याने पाहिलं पाहिजे. २० तारखेला रेल्वे इंजिन या निशाणीवर अशोक मेश्राम यांना विजयी करा हे सांगायला मी आलो आहे असंही राज ठाकरे म्हणाले.