पुणे: राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या विद्यार्थ्याला मोठा मान मिळाला आहे. चिदानंद नाईक या विद्यार्थ्याने दिग्दर्शित केलेला ‘सनफ्लॉवर्स वेअर फर्स्ट वन्स टू नो’ हा लघुपट २०२५ मधील ऑस्कर पुरस्कारातील ‘लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म’ या विभागासाठीच्या स्पर्धेत निवडला गेला आहे. प्रतिष्ठेच्या कान महोत्सवात ल सेनेफ सिलेक्शन या विभागात ‘सनफ्लॉवर्स वेअर फर्स्ट वन्स टू नो’ पहिल्या पारितोषिकाचा मानकरी ठरला होता. कन्नड भाषेत असलेला हा चित्रपट लोककथा आणि परंपरा यावर बेतला आहे.
सूरज ठाकूर यांनी छायांकन, मनोज व्ही यांनी संकलन, अभिषेक कदम यांनी ध्वनि आरेखनाची जबाबदारी निभावली आहे. चिदानंद एफटीआयआयमध्ये शिकत असताना लघुपटाची निर्मिती करण्यात आली होती. चित्रपट महोत्सवांच्या वर्तुळात या लघुपटाचा गौरव झाला आहे. बंगळुरू आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात या लघुपटाला सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपटाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर आता हा लघुपट ऑस्कर पुरस्कारांमध्ये जागतिक स्तरावरील लघुपटांशी स्पर्धा करणार आहे. ऑस्करमध्ये दावेदारी करताना लघुपटाचे खेळ, पत्रकार परिषदा, प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून हा लघुपट ॲकॅडमीचे अधिकाधिक प्रतिनिधी, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.