कॅनडा हिंदू मंदिर हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींचा तीव्र निषेध
ओटावा : दोन दिवसांपूर्वी कॅनडाच्या ब्रेम्प्टन भागात हिंदू मंदिरावर खलिस्तानवाद्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेबाबत देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील निषेध व्यक्त केला आहे.
आमच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना धमकावण्याचे प्रयत्नही, अत्यंत निंदनीय असून, अशाप्रकारचं वर्तन खपवून घेतलं जाणार नाही, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. अशा भ्याड हिंसाचाराच्या घटना भारताच्या दृढनिश्चयाला दुर्बळ करू शकत नाही. अशा हल्लेखोरांवर कठोर कारवाई करून, कॅनडातील सरकार कायद्यानुसार कार्यवाही करेल, असे पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर पोस्टमार्फत म्हटले आहे. त्याचबरोबर या हल्ल्यानंतर आता कॅनडाने कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती सांभाळण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले आहे.
दरम्यान, खलिस्तानवाद्यांनी याआधीही भारतीय नागरिक, राजनैतिक अधिकाऱ्यांना लक्ष्य केले आहे. खलिस्तान्यांच्या कृतीवर पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदाच भाष्य केले असून कॅनडातील खलिस्तानवाद्यांविरोधात भारत ठामपणे उभा असल्याचा संदेश दिला आहे.