Sunday, December 15, 2024
Homeताज्या घडामोडीशिवडीत बाळा नांदगावकर यांना भाजपाचे समर्थन - आशिष शेलार

शिवडीत बाळा नांदगावकर यांना भाजपाचे समर्थन – आशिष शेलार

पूर्ण ताकदीने काम करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई : शिवडी विधानसभा मतदारसंघात मनसे नेते बाळा नांदगावकर यांना समर्थन देण्याची घोषणा मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार ऍड. आशिष शेलार यांनी मंगळवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी केली. हे समर्थन केवळ शिवडीपुरते असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवडी येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. आमदार शेलार म्हणाले, ज्या अपक्षाने भाजपाचा उल्लेख केला त्याला आमचे समर्थन नाही. कारण कुठलाही संवाद, चर्चा न करता, थेट अर्ज भरण्यात आला. मग दोघेच राहतात, महाविकास आघाडी आणि मनसे. मतदारांचा विचार करून उमेदवार कोण, हे पाहिले तर बाळा नांदगावकर आणि अजय चौधरी हे दोघे उभे आहेत. त्यामुळे काही प्रमेय ठरवून मूल्यमापन करावे लागेल. लोकांची कामे होण्यासाठी आपल्याला मतदान करायचे आहे. भाजपा विचारावर चालणारी आहे. त्यामुळे विचारधारा डोळ्या समोर ठेवून निर्णय घ्यायचा आहे, असे शेलार यांनी सांगितले.

‘उबाठा’ गटावर तोफ डागताना आशिष शेलार म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी दगाबाजी केली. महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा दगाबाज म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले जाईल. शिवडी हा वारकऱ्यांचा विभाग आहे. उद्धवजी आषाढीला पंढरपूरला गेले, पण पांडुरंगाच्या पायाला स्पर्श करणार नाही ही भूमिका घेतली. कोरोनाकाळात जेव्हा लोक देवाचा धावा करीत होते, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मंदिरे बंद केली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. त्यावेळी वारी रोखली आणि एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांना मदत केली असता, त्याची चेष्टा केली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा समलैंगिक म्हणून अपमान करणाऱ्या काँग्रेसला कधी खडे बोल सुनावले नाही. सावरकरांच्या बदनामीला मूक पाठिंबा दिला. ‘पीएफआय’वर बंदी आणली, त्यावर समर्थ करणारी भूमिका मांडली नाही. पालघर साधू हत्याकांड झाले, पण ना खेद ना दु:ख, ना चौकशीला तयार. सीएए ला विरोध केला, काश्मीर मध्ये ३७० हटवले त्याला विरोध. हिंदू समाज सडलेला आहे, असे शरजील उस्‍मानी म्‍हणतो यांना महाराष्‍ट्रात ठाकरे सरकार निर्दोश सोडते. मग आम्ही त्यांचे कसे समर्थन करणार, असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला.

लालबागच्या राजाची परंपरा खंडित करणाऱ्या ‘उबाठा’वर हल्लाबोल

‘उबाठा’चा उमेदवार कोण, हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. आम्ही टीव्हीवर पाहिले की, चौधरीना उमेदवारी दिली, तेव्हा सुधीर साळवी यांचे समर्थक आक्रमक झाले. परंतु, हे भोग आहेत. कोरोनाकाळात गणेशभक्त सांगत होते की गर्दी नको, ऑनलाइन दर्शन घेऊ, आम्हाला उत्सव साजरा करू द्या. पण सुधीर साळवी यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांची चाटूगिरी केली. गणेशभक्तांना काय वाटेल, याचा विचार न करता उद्धव ठाकरेंच्या हुकुमाखातर लालबागच्या राजाची १०० वर्षांची परंपरा खंडित केली. त्यामुळे सुधीर साळवी त्याचे परिणाम भोगत आहेत. अजय चौधरी २३ नोव्हेंबरला निकालादिवशी भोगतील. त्यामुळे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी कुठल्याही निमंत्रणाची वाट न बघता पूर्ण ताकदीने कामाला लागून मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन आमदार आशिष शेलार यांनी केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -