आरिफ शेख
जगात अमेरिका ही महाशक्ती मानली जाते. मात्र चीन तिला सातत्याने आव्हान देत आहे. चीनच्या नौदलाची ताकद अमेरिकेपेक्षा खूप-जास्त आहे. नौदलाच्या ताकदीच्या जोरावर चीनने हिंद महासागरात तसेच अन्यत्र सुरू केलेल्या कुरघोड्यांची भीती अमेरिकेला वाटते आहे. जागतिक लष्करी शक्ती बनण्याच्या चीनच्या घोषित महत्त्वाकांक्षेमुळे हे घडत आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी अमेरिका विविध उपाय योजत आहे.कंबोडियाच्या ‘रीम’ नौदल तळावर लक्ष रोखून असणाऱ्या उपग्रहावरून दोन वाढत्या आकृत्या दृश्यमान होत्या. त्यावरून अमेरिकेला भीती वाटू शकते की, दक्षिण चीन समुद्रातील तीन विवादित बेटांच्या पलीकडे चीन आपल्या क्षमतांचा विस्तार करत आहे. त्यावर चीनने केवळ कब्जाच केला नाही, तर मजबूत ताबा घेतला. चीनच्या नौदलाची १५०० टन वजनाची ए ५६ युद्धनौका या घाटाजवळ (लहान युद्धनौकांसाठी राहण्याची जागा) उभी आहे. हे घाट इतके मोठे आहेत, की तिथे मोठी युद्धनौका किंवा जहाजेही ठेवता येतात. चीनने किनारपट्टीवर अनेक बांधकामेही केली आहेत. हे चीनच्या नौदलाच्या वापरासाठी असल्याचे मानले जाते. हा चिनी नव्हे तर कंबोडियाचा तळ आहे. कंबोडिया खूपच लहान आहे आणि त्याची लष्करी क्षमताही मर्यादित आहे. कंबोडियाने चीनचे मांडलिकत्त्व स्वीकारल्यासारखे आहे. कंबोडियाचा तळ असला, तरी तिथे चिनी जहाजे आहेत. चीनकडून अधिक प्रशिक्षणाची गरज आहे, असे समर्थन करून कंबोडिया चीनच्या नौदलाला स्वतःचा तळ वापरू देत आहे; मात्र अमेरिकेसह इतर देश याकडे संशयाने बघत आहेत. चीनची वाढती सागरी शक्ती हा चर्चेचा विषय आहे. चीनकडे आता अमेरिकेपेक्षा जास्त जहाजे आहेत. आफ्रिकेतील जिबुती येथे चीनचा एकच परदेशी लष्करी तळ आहे, जो २०१६ मध्ये बांधला गेला होता. त्या तुलनेत अमेरिकेचे परदेशात जवळपास ७५० लष्करी तळ असून चीनजवळच्या जपान आणि दक्षिण कोरियासारख्या देशांमध्येही लष्करी तळ आहेत; मात्र अमेरिकेला हा समतोल बदलत असल्याची चिंता वाटते.
जागतिक लष्करी शक्ती बनण्याच्या चीनच्या घोषित महत्त्वाकांक्षेमुळे हे घडत आहे, असे त्या देशाचे मत आहे.
चीन आपल्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) अंतर्गत परदेशात पायाभूत सुविधा प्रकल्पांवर ज्या प्रकारे खर्च करत आहे, त्यावरून अमेरिकेला त्या देशाची महत्त्वाकांक्षा प्रचंड वाढल्याची चिंता जाणवते. या पायाभूत सुविधांचे बांधकामही चिनी लष्कराच्या मानकांनुसारच व्हायला हवे, असा त्या देशाचा आग्रह असतो. अमेरिकन तज्ज्ञांचा विश्वास आहे की चीन लष्करी तळ किंवा सामान्य बंदरांचे जाळे तयार करून त्याचा तळ म्हणून वापर करू शकेल. ‘रीम’ हा अशा पहिल्या तळांपैकी एक असेल. २०१७ पूर्वी ‘रीम’ नौदल तळाला अमेरिकेकडून आर्थिक मदत मिळाली होती. काही वर्षांपूर्वीपर्यंत कंबोडियाच्या दक्षिण टोकावर वसलेल्या ‘रीम’चे अमेरिकेच्या मदतीने अपग्रेडेशन केले जात होते. ही मदत कंबोडियाला देण्यात येणाऱ्या १० दशलक्ष डॉलर लष्करी मदतीचा एक भाग होती; पण २०१७ मध्ये कंबोडियातील प्रमुख विरोधी पक्षावर बंदी घालण्यात आली आणि त्यांच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले, तेव्हा अमेरिकेने ही मदत बंद केली. गुंतवणुकीसाठी आणि आर्थिक मदतीसाठी आधीच चीनवर अवलंबून असलेल्या कंबोडियाने लगेच बाजू बदलली. कंबोडियाने अमेरिकेसोबतचा संयुक्त लष्करी सरावही रद्द केला आहे. यानंतर आता कंबोडिया चीनसोबत तथाकथित गोल्डन ड्रॅगन प्रॅक्टिस लष्करी सराव करत आहे.
अमेरिकेने २०२० मध्ये ‘रीम’मध्ये बांधलेल्या दोन इमारती पाडल्या. यानंतर चिनी पैशाने बांधलेल्या इमारतींचा विस्तार होऊ लागला. गेल्या वर्षाच्या अखेरीस नवीन घाटही तयार झाला होता. तो जिबुती लष्करी तळाच्या ३६३ मीटर लांब घाटासारखा आहे. तो इतका लांब आहे, की चीनची सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौकाही तिथे तळ ठोकू शकते. लवकरच दोन्ही युद्धनौका ‘रीम’मध्ये तैनात करण्यात आल्या. या युद्धनौका किंवा तत्सम दोन युद्धनौका वर्षातील बहुतांश काळ तैनात राहिल्या. या युद्धनौका प्रशिक्षणासाठी उभ्या केल्याचा दावा कंबोडियाने केला आहे. या वर्षी होणाऱ्या गोल्डन ड्रॅगन सरावासाठी त्यांची तयारी केली जात आहे. चीन आपल्या नौदलासाठी दोन नवीन ए ५६ युद्धनौका बनवत असल्याचेही म्हटले आहे. ‘रीम’मध्ये चीनची उपस्थिती कायमस्वरूपी नाही, यावर भर दिला जात आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी या साइटच्या विस्ताराबाबत चिंता व्यक्त केली आहे. सॅटेलाइट प्रतिमांमध्ये नवीन घाटाव्यतिरिक्त एक ड्राय डॉक, गोदामे आणि इमारती आहेत, जे प्रशासकीय ब्लॉक आणि निवासी क्वार्टर असल्यासारखे दिसतात. यात चार बास्केटबॉल कोर्टदेखील आहेत. २०१९ मध्ये कंबोडिया आणि चीन यांच्यातील करार लीक झाल्याची बातमी ‘वॉल स्ट्रीट जर्नल’मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यात या तळाची ७७ हेक्टर जमीन चीनला ३० वर्षांच्या भाडेतत्त्वावर देण्याची चर्चा होती. लष्करी जवानांची कथित तैनाती आणि शस्त्रास्त्रांचा साठा यावरही चर्चा झाली.
कंबोडिया सरकारने ही बातमी ‘फेक न्यूज’ म्हणून फेटाळून लावली होती; मात्र येथे हे नमूद करणे महत्त्वाचे आहे, की नवीन जेटीवर केवळ चिनी युद्धनौका ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. फेब्रुवारीमध्ये आलेल्या दोन जपानी विनाशकांना जवळच्या सिनोविकविले येथे डॉक करण्यास सांगितले गेले. चीनला येथे कायमस्वरूपी उपस्थितीची परवानगी दिली गेली आहे. कॅलिफोर्निया-आधारित ‘रँड’ कॉर्पोरेशनचे वरिष्ठ धोरण संशोधक क्रिस्टिन गुनेझ म्हणतात की, ‘रीम’ तांत्रिकदृष्ट्या स्थानिक नाही. चीनच्या निधीतून त्याचा विस्तार झाला असला, तरी चीनला भाडेतत्त्वावर देण्यात आलेला नाही. आम्ही पाहत आहोत की चीनची जहाजे ‘रीम’मध्ये सतत थांबत आहेत. घटनात्मक बंदी टाळण्याचा एक मार्ग म्हणजे याला परदेशी तळ न म्हणता परकीय सैन्याला एक एक करून येथे येऊ देणे. बहुतेक विश्लेषकांचा विश्वास आहे की ‘रीम’मध्ये चीनची दीर्घकालीन उपस्थिती प्रत्यक्षात त्या देशाला फारशी फायदेशीर ठरणार नाही. दक्षिण चीन समुद्रात मिशिफ, फेरी क्रॉस आणि सुबी रिफ्स या तीन तळांवर त्याची उपस्थिती आहे. दक्षिण किनारपट्टीवर चिनी नौदलाच्या भक्कम उपस्थितीकडेही त्यांनी लक्ष वेधले. थायलंडच्या आखाताच्या तोंडावर असलेल्या ‘रीम’मध्ये चीनच्या तळामुळे कंबोडियाचे थायलंड आणि व्हिएतनाम हे शेजारी चिंताग्रस्त झाले आहेत. या आणि उत्तरेकडील इतर तळांना एकत्र करून व्हिएतनामला वेढा घालण्याचा चीनचा प्रयत्न म्हणून याकडे पाहिले जात आहे.
फिलिपिन्सप्रमाणेच व्हिएतनामचाही संपूर्ण दक्षिण चीन समुद्रातील बेटांवरून चीनशी वाद आहे. या प्रकरणावरून त्याच्या नौदलाची चिनी नौदलाशी झटापट झाली आहे. थायलंडच्या राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्यांनी सट्टाहिप थाई नौदलाच्या मुख्य बंदराच्या दक्षिणेला चिनी तळाच्या बांधकामावर चिंता व्यक्त केली आहे. तथापि, थायलंड आणि कंबोडिया यांच्यात अजूनही अनेक निराकरण न झालेले सीमावाद आहेत. चीनच्या नौदल तळांमुळे तणाव वाढत आहे. काही तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, पुढील अनेक वर्षांपर्यंत अमेरिकन सैन्याच्या जागतिक स्तरापर्यंत पोहोचणे चीनसाठी कठीण होईल; मात्र कोणताही देश या तक्रारी सार्वजनिकपणे पुढे आणू इच्छित नाही. चीनशी महत्त्वाचे आर्थिक संबंध असल्याने थायलंड कोणताही वाद निर्माण करू इच्छित नाही. त्याच वेळी, कंबोडियामध्ये त्याच्या विरोधात जनभावना भडकू नयेत, अशी व्हिएतनामची इच्छा आहे.
व्हिएतनामलाही चीनविरोधी भावना भडकवायला नको आहे. त्याच वेळी, भविष्यात चीन हिंदी महासागरात नौदल तळ उभारण्याच्या शक्यतेने अमेरिकन आणि भारतीय रणनीतीकार अधिक चिंतेत आहेत. चीनच्या अशा नौदल तळांमध्ये श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदराचा समावेश होतो. २०१७ मध्ये चीनच्या सरकारी कंपनीने ते ९९ वर्षांच्या लीजवर घेतले होते. त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या ग्वादर बंदराचा पुनर्विकास चीनच्या निधीतून करण्यात आला आहे. असे असले तरी पुढील अनेक वर्षांपर्यंत अमेरिकन सैन्याच्या पातळीपर्यंत पोहोचणे चीनसाठी कठीण राहील. चिनी नौदलाच्या शक्तीच्या प्रक्षेपणात ‘रीम’ फारशी भर घालत नाही. चीनला जिथे पोहोचायचे आहे, तिथे पोहोचण्यास ते मदत करत नाही. तथापि, बुद्धिमत्ता गोळा करणे, उपग्रहांचा मागोवा घेणे आणि लांब पल्ल्याच्या लक्ष्यांचे निरीक्षण करणे आणि शोधणे यासाठी ‘रीम’ मोठी भूमिका बजावू शकते.