Uttarakhand Bus Accident : उत्तराखंडच्या अल्मोडा या ठिकाणी एका प्रवाशी बसचा भीषण अपघात झाला आहे. मार्चुला परिसरात प्रवाशांनी भरलेली बस दरीत पडल्याची माहिती मिळत आहे. जवळपास ४० प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली आहे. सध्या या ठिकाणी SDRF आणि पोलीस प्रशासनाकडून बचावकार्य सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अल्मोडा एसपींनी अपघातात २० जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.
चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले
मिळालेल्या माहितीनुसार, एक प्रवाशी बस आज सकाळी गौरीखालहून रामनकगरडे निघाली होती. यावेळी बसमध्ये साधारण ४० पेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करत होते. यावेळी गढवाल-रामनगर मार्गावरील सल्ट गावाजवळ असलेल्या वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यानंतर अवघ्या काही क्षणातचं ही प्रवाशी बस खोल दरीत कोसळली.अनेक प्रवाशांनी बस खाली कोसळताच आरडाओरड सुरु केली. या दुर्घटनेदरम्यान काही प्रवाशी हे बसमधून बाहेर फेकले गेले. आतापर्यंत या दुर्घटनेत १५ पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. काही जखमी प्रवाशांनी सकाळी नऊच्या सुमारास नियंत्रण कक्षाला याबद्दलची माहिती दिली होती.
बचावकार्य वेगाने सुरु
या ठिकाणी सध्या मोठ्या वेगाने बचावकार्य सुरु आहे. तसेच या दुर्घटनेदरम्यान जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच SDRF आणि पोलीस प्रशासनाकडून मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विनीत पाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सल्ट आणि रानीखेत येथून काही बचावपथके घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या बचाव कार्य वेगाने सुरु आहे. या दुर्घटनेत नेमका किती लोकांचा मृत्यू झाला, याची माहिती बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच सांगता येईल. या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.