आग्रा : उत्तर प्रदेशातील आगरा येथे आज एक मोठी दुर्घटना घडली. हवाई दलाच्या विमानाने आकाशातच पेट घेतला. ही आग वाढल्यानंतर विमान एका शेतात कोसळले. दरम्यान, अपघातावेळी विमानातील पायलट आणि आणखी २ व्यक्तींनी शेतात उडी मारून आपला जीव वाचवला. विमान जमिनीवर कोसळताच आग आणखी भडकली. आग्रा येथील कागारौल भागातील सोंगा गावाजवळ ही दुर्घटना घडली.
या घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचत आहेत. विमान शेतात कोसळताना पाहून गावातील सर्व लोकही तेथे पोहोचले. या दुर्घटनेनंतर, तातडीने चौकशीचे आदेश करण्यात आले आहेत. तसेच, दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी संबंधित सर्व संस्थांना सतर्क करण्यात आले आहेत.
पंजाबमधून केले होते उड्डाण –
एएनआय या वृत्त संस्थेने संरक्षण अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, हे मिग-२९ विमान होते. पंजाबमधील अदमपुर येथून या विमानाने उड्डाण घेतले होते. विमान रूटीन एक्सरसाइजसाठी आगरा येथे जात होते. दुर्घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.