डोंबिवली : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता कंबर कसली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा दिवस संपला असून आता कोण कोणाविरोधात लढणार आहे हे चित्र स्पष्ट झाले आहे. तसेच, दिवाळीची धामधामूही आता आटोपली असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला पुन्हा एकदा सुरुवात केली आहे.
२०१९ मध्ये निवडून आलेल्या एकमेव आमदाराच्या मतदारसंघातून राज ठाकरेंनी (Raj Thackeray) प्रचाराचा नारळ फोडला. काल दिवाळी संपली आणि आजपासून फटाके फुटणार असे म्हणत राज ठाकरेंनी आजची पहिलीच सभा दणाणून सोडली. या पहिल्याच सभेत त्यांनी उद्धव ठाकरे, अजित पवारांना लक्ष्य केले. २०१९ चा महाविकास आघाडीच्या स्थापनेआधीच्या परिस्थितीवर त्यांनी गंमतीशीर भाष्य केले आहे. आमचा राजू विधानसभेत एकटा होता. माझा आमदार विकणारा नाही तर टिकणारा होता. नाहीतर सहज माझी निशाणी घेऊन दुसरीकडे बसला असता. एकटाच तर होता. पण असल्या गोष्टी माझ्या सहकाऱ्यांना शिवत नाहीत”, असं म्हणत राज ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांचं कौतुक केले.
गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रातील राजकारणाचा जो चिखल झाला त्याला शरद पवार हेच जबाबदार असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी राज्यातील गेल्या पाच वर्षातील राजकारणावर आणि विविध पक्षांनी आणि नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेवर हल्ला चढवला.
माझे व्हिजन या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी अमित शहा, नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर टीका केली. मला नेहमी विचारले जाते तुम्ही भूमिका बदलल्या. पण हा प्रश्न पत्रकार इतर नेत्यांना विचारत नाहीत. मी कधीच भूमिका बदलल्या नाहीत. मी ज्या गोष्टी बोललो आहे, ज्या भूमिका मांडल्या आहेत त्या कोणत्याही पदासाठी मुख्यमंत्रीपदासाठी, आमदार निवडणून आणणाऱ्या राजकीय सौदेबाजीतून घेतल्या नाहीत. जे चांगले होते त्याला चांगले म्हटले आणि जे चूकीचे होत त्याला चूक म्हटले. मात्र गेल्या दोन अडीच वर्षात जे काही केले. त्यांना हा प्रश्न विचारणे गरजेचे आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
घाणेरडे राजकारण!
“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे फोडाफोडीचे राजकारण करीत असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. पूर्वी आमदार फोडाफोडीचे राजकारण असायचे. आता मात्र पक्ष, निशाणी, नाव ताब्यात घेण्याचे घाणेरडे राजकारण सुरू आहे. २०१९ ला निवडणुका झाल्या. २०१९ निवडणुका संपल्या, निकाल लागला. मग सकाळचा शपथविधी झाला. पंधरा मिनिटांत ते लग्न तुटले. कारण काकांनी डोळे वटारले. मग लगेच घरी आले. काका मला माफ करा म्हणाले. मग ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या होत्या, त्यांच्याचबरोबर जाऊन बसले. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधात निवडणूक लढवली होती. पण नंतर त्यांच्याबरोबर बसले”, असे म्हणत राज ठाकरेंनी अजित पवार आणि उद्धव ठाकरेंना शाब्दिक चिमटा काढला.