Wednesday, April 30, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

दिवाळीत फटाके फोडताना जखमींची संख्या ४९ वर

दिवाळीत फटाके फोडताना जखमींची संख्या ४९ वर

मुंबई : दिवाळीमध्ये ठिकठिकाणी मोठ्य प्रमाणात फटाके फोडण्यात आले. मात्र हे फटाके फोडताना मुंबईमध्ये गेल्या चार दिवसांत जवळपास ४९ जण जखमी झाले आहेत. यामध्ये लहान मुलांची संख्या अधिक आहे.

दिवाळीनिमित्त शहरात ठिकठिकाणी फुलबाजे, भुई चक्र, सुतळी बार, रॉकेट असे विविध प्रकारचे फटाके मोठ्या प्रमाणात फोडण्यात येत आहेत. हे फटाके फोडताना मुंबईमध्ये विविध ठिकाणी जवळपास ४९ जण जखमी झाले आहेत. केईएम रुग्णालयात १६ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. यामध्ये पाच लहान मुलांचा समावेश आहे. शीव रुग्णालयात १२ जणांवर उपचार करण्यात आले आहेत. जखमींपैकी पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, बहुतांश रुग्ण हे भाजलेले आहेत.

त्याचप्रमाणे नायर रुग्णालयात नऊ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. जखमींपैकी एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित रुग्णांना बाह्यरुग्ण विभागात उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. कूपर रुग्णालयामध्ये दोन रुग्णांवर उपचार करण्यात आले असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णलयांच्या प्रमुख व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालक डॉ. नीलम अंद्राडे यांनी दिली आहे.

जे. जे. रुग्णालयामध्ये चारजण उपचारासाठी आले होते, यामध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. जखमींपैकी तीन जणांवर बाह्यरुग्ण विभागातच उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले तर एका व्यक्तीच्या डोळ्याला दुखापत झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. जी. टी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तिघांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तिघेही किरकोळ जखमी झाले होते. त्याचप्रमाणे फटाके फोडताना जखमी झाल्याने सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये तीन जण उपचारासाठी दाखल झाले होते. या सर्वांना उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. फटाके फोडताना हात, पाय व चेहरा भाजलेल्यांची आणि डोळ्याला दुखापत झालेल्यांची संख्या अधिक आहे.

Comments
Add Comment